Coronavirus Lockdown : मिठी मारली म्हणून तरुणाला चोप देणाऱ्या पोलिसाचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 09:58 PM2020-05-08T21:58:22+5:302020-05-08T22:01:54+5:30
Coronavirus Lockdown : कॉन्स्टेबलची ओळख पटली आहे. तो सागरपूर पोलिस ठाण्यात तैनात होता. त्याला निलंबित करण्यात आले असून त्याची विभागीय चौकशी सुरू आहे.
नवी दिल्ली - दक्षिण-पश्चिम दिल्लीतील सागरपूर भागात लोकांना मिठी मारल्याच्या आरोपाखाली एका 30 वर्षीय व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या एका हवालदाराने मारहाण केली आणि त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले. ही घटना बुधवारी घडली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या व्हिडिओमध्ये एक पोलीस त्या व्यक्तीला काठीने मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, ती व्यक्ती तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना कॉन्स्टेबल आणि स्थानिक दोघेही त्याला मारहाण करीत होते.तसेच त्या वाटेवरून जाणाऱ्या एका व्यक्तीने मारहाणीचे कारण विचारले असता तो लोकांना मिठी मारत असल्याचे कारण देण्यात आले. पीडित तरुणाचे नाव इमरान, सागरपूर येथील रहिवासी आहे.
इमरानच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, इमरान मशिदीत गेला आणि त्यानंतर तो त्याच भागात राहणाऱ्या आपल्या बहिणीला भेटायला गेला. त्याने आपल्या बहिणीच्या घरी परत जात असताना ही घटना घडली. इमरानच्या कुटूंबातील सदस्याने सांगितले की, इमरान परत येत असताना त्याला पार्कजवळ एक पोलीस दिसला आणि तो लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करीत आहे असे त्यांला वाटल्याने घाबरून पळण्यास त्याने सुरवात केली. पोलिसांनी सांगितले की, कॉन्स्टेबलची ओळख पटली आहे. तो सागरपूर पोलिस ठाण्यात तैनात होता. त्याला निलंबित करण्यात आले असून त्याची विभागीय चौकशी सुरू आहे.
Coronavirus : खळबळजनक! आर्थर रोड कारागृहातील ७७ कैद्यांसह २६ पोलिसांना कोरोना