Coronavirus: धक्कादायक! आयसोलेशनमध्ये गर्भवती महिलेवर आरोग्य कर्मचाऱ्याने केला दोन दिवस बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 02:07 PM2020-04-12T14:07:23+5:302020-04-12T14:19:50+5:30
माझी सून रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार होती.
नवी दिल्ली: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही गेल्या २४ तासांत १,०३५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने देशातील एकूण बाधितांची संख्या ८ हजार ४१७ च्या घरात गेली आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यत देशात २९० लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बिहारमधील गयाच्या अनुग्राह नारायण मगध मेडिकल कॉलेज व रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने सलग दोन दिवस महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात महिलेच्या सासूने रोशनगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून येत होती. यासाठी 25 मार्च रोजी ही महिला लुधियानाहून आपल्या पतीसमवेत रुग्णालयात आली होती. परंतु महिलेची कोरोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आले. पण घरी गेल्यानंतर महिलेला जास्त रक्तस्त्राव सुरु झाला आणि तिचा दुसर्याच दिवशी मृत्यू झाला असल्याचे महिलेच्या सासूने सांगितले.
माझी सून रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार होती. परंतु रुग्णालयातील गेटमॅनने तिला इज्जतीची भीती दाखवली. ती घाबरली आणि तिने तक्रार केली नाही असा दावा महिलेच्या सासूने केला आहे. माझी सून व तिच्या जन्मलेल्या बाळाच्या मृत्यूला आरोग्य कर्मचारी जबाबदार असल्याचे सासूने सांगितले.
लॉकडाऊनमध्ये लहान मुलांच्या अत्याचारात झाली वाढ
लॉकडाऊनमध्ये केवळ महिलाच नाहीत तर मुलेही घरातच बंद आहेत. ही त्याची मोठी समस्या बनली आहे कारण त्याला अजूनही छळ करणाऱ्यांसोबत 24 तास घालवावे लागत आहे. हेच कारण आहे की 20 ते 31 मार्च दरम्यान 'चाईल्डलाईन 1098' ला देशभरातून 3 लाख 7 हजार कॉल आले. चाइल्डलाइन इंडियाचे उपसंचालक हर्लीन वालिया म्हणाले की, 92,105 कॉलपैकी 30 टक्के कॉल मुलांना त्रास व हिंसाचारापासून वाचवण्यासाठी केले गेले. 24 मार्चपासून देशात लॉकडाउन लागू आहे. म्हणजेच लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात ही वाढ झाली आहे. वालिया यांच्या मते, लॉकडाऊननंतर अशा तक्रारींमध्ये 50% वाढ झाली आहे.
महिलांवरील अत्याचारही वाढले
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, 24 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात महिलांवरील अत्याचार केल्याच्या 1,257 तक्रारी आल्या. अशी भीती अशी आहे की, अशा बऱ्याच घडल्या असतील, परंतु छळ केल्यानंतर चोवीस तास घरीच असल्याने भीतीपोटी महिला तक्रार नोंदवू शकणार नाहीत.