coronavirus : घराबाहेर न पडण्याचे आवाहन करणाऱ्या दुकानदाराची बेदम मारहाण करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 11:30 AM2020-03-26T11:30:59+5:302020-03-26T11:32:09+5:30
लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करणे एका दुकानदाराच्या जीवावर बेतले आहे.
रांची - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी घराबाहेर न पडण्याचे तसेच सोशल डिस्टंसिंग ठेण्याचे आवाहन विविध मान्यवरांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वजण करत आहेत. मात्र लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करणे एका दुकानदाराच्या जीवावर बेतले आहे. या दुकानदाराने घराबाहेर पडू नका म्हणून सांगितल्याने संतापलेल्या काही ग्रामस्थांनी त्याला मारहाण केली. यात या 45 वर्षीय दुकानदाराचा मृत्यू झाला.
हा धक्कादायक प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. येथील पालमू जिल्ह्यातील चाक उदयपूर येथे राहणारा काशी साव हा गावातील चार लोकांना घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला देत होता. मात्र त्याचे म्हणणे लोकांना फारसे रुचले नाही. त्यांनी संतप्त होऊन काशी याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला.
काशी याचे किराणा मालाचे दुकान होते. सदर हल्लेखोर हे या दुकानात आले होते. दरम्यान, या दुकानाचीही नासधूस करण्यात आली. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या काशीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथेच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. देशभरात आतापर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 600 च्या पुढे पोहोचली आहे. तर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे देशासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या बाधितांची संख्या 600 पर्यंत पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कालपासून 14 एप्रिलपर्यंत देशात लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे यूरोपीय देश आणि अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. संपूर्ण जगात मिळून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 20 हजारांवर पोहोचली आहे.