मास्क, सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडसत्र; छाप्यांमध्ये ३० लाखांचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 05:07 PM2020-03-29T17:07:06+5:302020-03-29T17:07:47+5:30
अत्यावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट असलेल्या सॅनिटायझर आणि मास्कची वाढीव भावाने विक्री करण्याकरीता जमा केलेला बेकायदेशीर साठा मेडीकल स्टोअरमधून जप्त करण्यात आला.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे बाजारात मास्क आणि सॅनिटाझरचा काळाबाजार सुरु झाला आहे. अत्यावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट असलेल्या सॅनिटायझर आणि मास्कची वाढीव भावाने विक्री करण्याकरीता जमा केलेला बेकायदेशीर साठा मेडीकल स्टोअरमधून जप्त करण्यात आला.
पहिल्या कारवाईमध्ये दिंडोशी, मालाड (पूर्व), मुंबई येथील एका मेडीकल स्टोअर मध्ये बेकायदेशिररित्या या वस्तूंची विक्री सुरु होती. छाप्यावेळी सॅनिटायझरच्या 175 बॉटल आणि सर्जिकल सॅनिटायझरच्या ६१४ बॉटलचा साठा आढळून आला. याचे बिल मागितले असता दुकानदार ते दाखवू शकला नाही. हा एकूण २,२२,१९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या कारवाईत धारावीतील तीन गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी त्यांच्याकडे २७.२५ लाख रुपये किंमतीचे मास्क आणि सॅनिटायझर जप्त करण्यात आले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांना ३१ मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.