CoronaVirus: धक्कादायक! आर्थिक संकटाला तोंड कसे देणार? टेन्शन आल्याने जर्मन अर्थमंत्र्यांची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 07:54 PM2020-03-29T19:54:17+5:302020-03-29T19:57:06+5:30
CoronaVirus: श्चायफेर हे गेल्या १० वर्षांपासून हेस्सेचे अर्थखाते सांभाळत होते.
फ्रँकफर्ट : कोरोनामुळे अवघे जगच आर्थिक मंदीमध्ये प्रवेश करत असल्याचा इशारा आयएमएफने दिला आहे. याचा मोठा फटका विकसनशील देशांना बसणार असल्याचे म्हटलेले असले तरीही विकसित देशांच्या अर्थव्यवस्थाही कोसळण्याच्या तयारीत आहेत. याचेच टेन्शन आल्याने जर्मनीच्या हेस्से राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
थॉमस शेफर असे या जर्मनीच्या अर्थमंत्र्यांचे नाव आहे. ते ५४ वर्षांचे होते. शनिवारी त्यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडल्याचे राज्याचे प्रधान व्होल्कर बौफियर यांनी म्हटले आहे. सरकारी यंत्रणांनीही त्यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.
आम्हाला शेफर यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त ऐकून धक्काच बसला. ही घटना खूप दु:खदायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हेस्सेमध्ये जर्मनीची आर्थिक राजधानी फ्रँकफर्ट हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहरामध्ये डच बँक आणि कॉमर्सबँक सारख्या प्रमुख बँकांचे मुख्यालय आहे. युरोपियन सेंट्रल बँक देखील फ्रँकफर्ट येथे आहे.
शेफर हे गेल्या १० वर्षांपासून हेस्सेचे अर्थखाते सांभाळत होते. त्यांनी अर्थव्यवस्था सुधरण्याचे मोठे काम केलेले आहे. देशासमोरील कठीण काळामध्ये त्यांची गरज होती. त्यांचे कंपन्या आणि नागरिकांमध्ये वजन होते, असे उद्गार बौफियर यांनी काढले.