CoronaVirus : धक्कादायक! क्वारंटाईन केलेल्या तरुणाची आत्महत्या; दोन दिवसांपूर्वीच पोहोचलेला गावी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 02:30 PM2020-04-02T14:30:05+5:302020-04-02T14:33:14+5:30
CoronaVirus : त्याला श्वास घेण्यात अडचण आल्यानंतर त्याला क्वारंटाइन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.
मेरठ - गुरुवारी उत्तर प्रदेशमधील शामली येथील क्वारंटाइन वॉर्डमध्ये संभाव्य कोरोनाबाधित तरुणाने आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वी हा तरुण त्याच्या गावी आला होता. त्यावेळी त्याला श्वास घेण्यात अडचण आल्यानंतर त्याला क्वारंटाइन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. या युवकाच्या आत्महत्येच्या वृत्ताने अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.
शामलीतील एका निर्माणाधीन रुग्णालयात बांधण्यात आलेल्या एका वेगळ्या वॉर्डात दाखल झालेल्या युवकाच्या आत्महत्येच्या वृत्ताने रुग्णालयात खळबळ माजली. हा तरुण दिल्लीत काही व्यवसाय करतो असे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी तो आपल्या गावी परत आला, त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास झाला.
त्याला त्वरित क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आणि त्याचे नमुना मेरठ मेडिकलमध्ये तपासणीसाठी पाठविला गेला, परंतु अद्याप अहवाल आलेला नाही. गुरुवारी त्याने आत्महत्या केली. सहारनपूर आयुक्त यांनी माहिती दिली की, मृत व्यक्तीला व्यवसायात लाखोंचे नुकसान झाले होते. या प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांचा सखोल चौकशी करत आहे.
एसपी शामली विनीत जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सीएमओ शामली संजय भटनागर यांनी पोलिसांना माहिती दिली की आरोग्य विभागामार्फत बांधकाम सुरू असलेल्या जिल्हा रूग्णालयाच्या क्वारंटाइन भागात दाखल झालेल्या संभाव्य कोरोनाबधित युवकाने आत्महत्या केली आहे. माहिती मिळताच आदर्श मंडी पोलिस ठाणे घटनास्थळी पोहोचले व तपास केला. एसपीच्या म्हणण्यानुसार, एका तरूणाने गगळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून येते. हा तरुण कंधलका येथील नानूपुरी गावचा रहिवासी आहे. तपासणीनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.