Coronavirus : चोर निघाला कोरोना पॉझिटिव्ह, २० पोलिसांना केले क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 04:46 PM2020-04-28T16:46:52+5:302020-04-28T16:49:24+5:30
Coronavirus : ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने बांगूर नगर पोलीस ठाण्यात एकाच खळबळ उडाली.
मुंबई - चोरी आरोपाखाली एका २२ वर्षीय चोरास बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर कोर्टाने त्याला २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात त्याला पाठवत असताना तत्पूर्वी कारागृह प्रशासनाने आरोपीची कोरोना टेस्ट करण्यास सांगितली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने बांगूर नगर पोलीस ठाण्यात एकाच खळबळ उडाली. त्यामुळे २० पोलिसांना जणांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे.
२२ वर्षीय चोर गोरेगाव पश्चिमेला राहतो. त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २० एप्रिलला अटक चोर आणि त्याचे दोन मित्र एका पानटपरीतून सिगारेट चोरण्यासाठी गेले होते. या तिघांनी पानटपरीवाल्यावर चाकूचा हल्ला करून त्याच्याकडील ३५०० रुपयांची रक्कम पळवून फरार झाले. या तिघांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. पानटपरीवाल्याच्या तक्रारीनंतर या चोराविरोधात बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसऱ्या दिवशी रिमांडसाठी चोरांना बोरिवली येथील न्याय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले. तेव्हा २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. तळोजा मध्यवर्ती तुरुंगात पाठविण्याआधी करोना टेस्ट झाली नसल्याने तुरुंगाधिकाऱ्याने त्याला तुरुंगात घेण्यास मनाई केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची करोना टेस्ट केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आणि पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे २० पोलिसांना १४ दिवसांसाठी क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. तसेच त्याच्या संपर्कातील इतरांचा तपास केला जात आहे.