coronavirus: ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक, चारपट जास्त पैशांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 06:10 AM2020-07-11T06:10:28+5:302020-07-11T06:11:11+5:30
रेमडेसिवीरच्या एका इंजेक्शनची किंमत ५ हजार ४०० रुपये असताना ते काळ्याबाजारात २० हजार रुपयांना विकले जात होते.
मीरा रोड : अत्यवस्थ कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणा-या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाºया दोघांना मीरा रोड पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली. त्यांच्याकडून चार इंजेक्शन जप्त केली असून त्याची किंमत ८० हजार रुपये इतकी ठरली होती. रेमडेसिवीरच्या एका इंजेक्शनची किंमत ५ हजार ४०० रुपये असताना ते काळ्याबाजारात २० हजार रुपयांना विकले जात होते.
मीरा रोडमधील एका कोरोना रुग्णाच्या परिचिताने या इंजेक्शनसाठी धावपळ सुरू केली. त्या वेळी एका व्यक्तीने या एका इंजेक्शनसाठी ३० हजार रुपयांची मागणी केली. परंतु चार इंजेक्शन हवी असल्याने तडजोडीनंतर एका इंजेक्शनचे २० हजार याप्रमाणे चार इंजेक्शनचे ८० हजार रुपये ठरले.
तक्रारदाराने या प्रकरणी मीरा रोड पोलिसांना माहिती दिल्यावर मीरा रोडच्या साईबाबानगर भागात शुक्रवारी सायंकाळी पोलिसांना सापळा रचला. हे औषध विकायला आलेल्या राल्फ टोनी रॉड्रिक्स (३१) व सोनू डॅनियल दर्शी (२५) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे रेमडेसिवीरची ४ इंजेक्शन मिळाली. ती इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. यातील सोनू हा औषध विक्रीच्या दुकानात काम करणारा आहे. त्याने ही इंजेक्शन मुंबईवरून आणल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस मुंबईतील विक्रेत्याचा शोध घेत आहेत.
मागणी, पुरवठ्यात तफावत
रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी व पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. ५ हजार ४०० रुपये किंमत असलेले हे इंजेक्शन काळ्याबाजारात अव्वाच्या सव्वा दराने विक्री केले जात आहे.