Coronavirus : होम क्वारंटाइन केलं असताना नसता प्रताप केला अन् अंगाशी आला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 06:14 PM2020-03-24T18:14:35+5:302020-03-24T18:17:06+5:30
Coronavirus : तिघांना पालिकेने पवई येथे होम क्वारंटाईनसाठी व्यवस्था केलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहेत.
मुंबई : दुबईहून भारतात आलेल्या तिघांना होम क्वारंटाईन केले असताना, तिघांनी शासकीय यंत्रणेला न कळवता मित्राच्या घरी ठाण मांडल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड़ झाले. तिघांना पालिकेने पवई येथे होम क्वारंटाईनसाठी व्यवस्था केलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहेत.
पोर्ट झोनच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मार्च रोजी सकाळी ६ वाजता दुबईतून ३ भारतीय विमानाने भारतात आले होते. यापैकी दोन जण दुबई येथे प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनचे काम करीत असून दुसरा इसम हा दुबईमध्ये राहत असलेल्या भावास भेटण्यासाठी गेला होता. तिघांची मुंबई विमानतळावर वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला होता आणि त्यांची तात्पुरती सोय साकीनाका, अंधेरी व गोरेगाव येथे करण्यात आली होती. तसेच त्यांनाा मूळ गाव झारखंड येथे जाण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र, या त्रिकूटाने शासकीय यंत्रणेला न कळविता वडाळा येथे भाड्याने राहत असलेल्या मित्राकडे २२ मार्च रोजी पहाटे दोन वाजता धाव घेतली. त्याबाबत त्यांनी महानगरपालिका किंवा पोलीस यंत्रणेस कळविले नाही.
Coronavirus : मुंबईत क्वारंटाइनमधून पळालेल्या १५ जणांची धरपकड
सावधान! विनाकारण घराबाहेर पडणे भोवणार; पोलिसांकडून ११२ गुन्हे दाखल
मंगळवारी याबाबत वडाळा पोलिसांना समजताच तिघांना ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांना ३ एप्रिलपर्यंत होम क्वारंटाइन करत पवई येथे पाठविण्यात आले आहे. तसेच तिघांवर शासकीय यंत्रणेचे आदेश न पाळल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे करंदीकर याांनी साांगितले.