CoronaVirus महाबळेश्वरला मौजमजेसाठी जाण्यास वाधवांवर कोणाचा वरदहस्त? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 12:22 AM2020-04-10T00:22:43+5:302020-04-10T00:26:25+5:30
वाधवान कुटुंबातील २३ सदस्यांवर महाबळेश्वरमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मुंबई : डीएचएफएलची मालकी असलेले तसेच येस बँक घोटाळ्यात नाव असलेल्या वाधवा कुटुंबातील तब्बल २३ सदस्यांना महाबळेश्वरला जाण्यासाठी अत्यावश्यक परवानगी मिळाली. यामुळे लॉकडाऊन असतानाही श्रीमंत लोकांना वेगळा न्याय देण्यात येत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
वाधवा कुटुंबातील २३ सदस्यांवर महाबळेश्वरमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना गृहखात्याच्या सचिवानेच खंडाळा ते महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिल्याने उद्धव ठाकरे सरकारसमोर मोठा वाद उभा ठाकला आहे.
दोन झारखंड पासिंग आणि तीन मुंबई पासिंगच्या अलिशान कारमधून २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी गृह खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. यावर फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्रात मोठ्या आणि श्रीमंत लोकांना लॉकडाऊन नाही का? महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांच्याच परवानगीने हे कुटुंबीय महाबळेश्वरला हॉलिडे साजरा करण्याठी गेले. एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी याचे दुष्परिणाम माहिती असूनही एवढी मोठी चूक करूच शकत नाही. यामुळे कोणाच्या आदेश किंवा वरदहस्तामुळे हे केले गेले? मुख्यमंत्री आणि गृह मंत्र्यांनी याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे.
No lockdowns for mighty & rich in Maharashtra?
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 9, 2020
One can spend holidays in Mahabaleshwar with official permission from police.
It is not possible that a senior IPS officer would do such gross mistake knowing the consequences on his own.
(1/2) https://t.co/0Ey8j938k8
याला कशी परवानगी देण्यात आली याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली.