Coronavirus: 'घर खाली कर अन्यथा बलात्कार करु'; कोरोनाच्या धास्तीने महिला डॉक्टरला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 12:19 PM2020-03-30T12:19:58+5:302020-03-30T12:22:02+5:30
ओडिशातील भूवनेश्वर येथील हे प्रकरण आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. ही महिला डॉक्टर ज्यूनिअर डॉक्टर म्हणून एम्समध्ये काम करते.
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा धोका भारतात दिवसागणिक वाढत चालला आहे. अशातच डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. मात्र अशातच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत एम्समधील महिला डॉक्टरला घर खाली न केल्यास बलात्कार करु अशाप्रकारे धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ओडिशातील भूवनेश्वर येथील हे प्रकरण आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. ही महिला डॉक्टर ज्यूनिअर डॉक्टर म्हणून एम्समध्ये काम करते. ती ज्या सोसायटीत राहते तेथे काम करणाऱ्या एका माणसाने तिला घर खाली करण्यास सांगितले. जर घर खाली नाही केलं तर त्याचे परिणाम वाईट होतील. तुझ्यावर बलात्कार करु अशी धमकी दिल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला आहे. आरोपीला भीती आहे की या महिलेमुळे सोसायटीत कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
एफआयआरमध्येम म्हटलं आहे की, सोसायटीच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीने महिला डॉक्टरला तू एम्समध्ये काम करते, कोरोनाग्रस्तांशी तुझा सारखा संपर्क होत असतो त्यामुळे तू रुम खाली कर असं बजावत होता. गेल्या आठवडाभरापासून या व्यक्तीने महिलेच्या मागे घर सोडण्याची मागणी करत होता. मात्र बलात्काराची धमकी दिल्यानंतर या महिला डॉक्टरने या व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या महिला डॉक्टरने पोलिसांना सांगितले की, मागील अनेक वर्षापासून मी या सोसायटीत राहते. मी कोरोना व्हायरस संक्रमित लोकांच्या संपर्कात नाही असं मी आरोपीला सांगितले होते. तरीही तुझ्यामुळे सोसायटीत कोरोना पसरू शकतो त्यामुळे तू इथून निघून जा असं तो सांगत होता. पीडित महिला डॉक्टरच्या सांगण्यावरुन आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन तपास सुरु झाला आहे.
दरम्यान, घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावे. डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे करताना त्यांना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे तरीही काही ठिकाणी अशा घटना घडत असतील तर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही शासनाने दिला आहे.