Coronavirus: कोरोनाची दहशत! लोकांना फसवण्यासाठी गुन्हेगारांची नवी शक्कल; पैसे द्या अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 11:34 AM2020-03-26T11:34:08+5:302020-03-26T11:38:34+5:30
सायबर गुन्हेगारांनी अजब शक्कल शोधून काढली आहे. त्यासाठी त्यांनी लोकांच्या मनात असणाऱ्या कोरोनाच्या दहशतीचा वापर केला आहे.
नवी दिल्ली – जगभरात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २१ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या धास्तीने लोकांना घराच्या बाहेर पडू नये असं आवाहन सरकारने केलं आहे. कोरोनाची दहशत लोकांमध्ये पसरली आहे याचाच फायदा सायबर क्राईम करणाऱ्यांनी घेतला आहे.
जगातील लोकांना कोरोनाची दहशत दाखवून त्यांची फसवणूक करण्याचा धंदा सायबर गुन्हेगारांनी सुरु केला आहे. ते कधी जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी म्हणून फसवणूक करतायेत तर कोविड १९ च्या नावावर बनावट वेबसाईट्स बनवून लोकांना शिकार बनवत आहेत. आता त्यांनी नवीन फंडा शोधला आहे. ब्रिटिश सिक्युरिटी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कंपनीच्या रिपोर्टनुसार सायबर गुन्हेगारांनी एक धमकीचा ईमेल लोकांना पाठवत आहेत.
या धमकीच्या ईमेलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जर यूजर्सने त्यांना पैसे दिले नाहीत तर यूजर्सच्या घराच्या कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसचा पसरवू शकतो. आतापर्यंत जगात सेक्सटॉर्शन ईमेल केले जात होते. यामध्ये युजर्सला सांगितलं जातं होतं की, तुमचे अश्लिल फोटो आमच्याकडे आहेत जर पैसे दिले नाहीतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करु अशी धमकी दिली जात असे.
पण आता सायबर गुन्हेगारांनी अजब शक्कल शोधून काढली आहे. त्यासाठी त्यांनी लोकांच्या मनात असणाऱ्या कोरोनाच्या दहशतीचा वापर केला आहे. सायबर गुन्हेगारांनी ईमेल पाठवून ४००० डॉलर बिटकॉईनच्या माध्यमातून मागितले आहेत. पैसे नाही दिले तर युजर्सच्या काही रहस्य उघड करु तसेच घरातील एका व्यक्तीला कोरोनाग्रस्त करु अशी धमकी देत आहेत. ईमेलमध्ये युजर्सला त्याचा जुना पासवर्डही सांगितला जात आहे. तसेच युजर्सच्या प्रत्येक सोशल साईट्सचा पासवर्ड माहिती असून अनेक दिवसांपासून त्यावर वॉच ठेवला जात आहे असा दावा गुन्हेगार करत आहेत.
तुमच्याकडे असा ईमेल आला तर काय कराल?
जर तुमच्याकडे अशाप्रकारे धमकीचा ईमेल आला तर घाबरण्याची गरज नाही. मागील काही दिवसात झालेल्या डेटा लीकमधून तुमचा जुना पासवर्डही लीक झाल्याची शक्यता आहे. Sophos च्या प्रिंसिपल रिसर्चचे पॉल डकलिन यांनी सांगितले की, काहीही पैसे पाठवू नका, हे सर्व खोटं आहे. त्यांच्याकडे कोणताही डेटा नसतो. जर तुम्ही पैसे देत असाल तर ते तुम्हाला आणखी घाबरवू शकतात.