Coronvirus : ... म्हणून लॉकडाऊनदरम्यान कर्मचाऱ्याने पाण्याच्या टाकीत उडी मारून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 01:26 PM2020-04-06T13:26:21+5:302020-04-06T13:28:16+5:30
Coronavirus : मृत इसमाने कंपनीकडून घरी जाण्यास पगार आणि सुट्टी मागितली होती.
राजस्थान - कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. राजस्थान येथील बाडमेरच्या एका टोल कर्मचाऱ्याने पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत इसमाने कंपनीकडून घरी जाण्यास पगार आणि सुट्टी मागितली होती. ते न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली.
राजस्थानमध्ये बाडमेर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी एका टोल कर्मचाऱ्याने पाण्याच्या टाकीत बुडून आत्महत्या केली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत कर्मचारी बाडमेर येथील सुंदर गावात राहणारा होता. तो हाथीतलास्थित टोल प्लाझा येथे नोकरी करायचा. लॉकडाऊनदरम्यान मृत कर्मचाऱ्याने घरी जाण्यासाठी पगार मागितला होता. मात्र, त्यास सुट्टी आणि पगार मिळाला नाही. त्यामुळे निराश झालेल्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली.
रवींद्र सिंह नावाचा युवक या कंपनीत गेल्या 5 वर्षांपासून वाहन चालकाचे काम करत असे. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मृत युवकाने कंपनीकडे पगार आणि सुट्टी मागितली होती. ती दिली नाही म्हणून नैराश्याने शनिवारी सायंकाळी उशीरा आत्महत्या केली. बाडमेर येथील पोलीस ठाण्यास याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. मात्र, रविवारी कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि पोलिसांनी कंपनी आणि दोषींवर कारवाई कारवाई तेव्हाच मृतदेहावर अंत्यसंस्कार करू असे कुटुंबीय म्हणाले.