लाचखोर डॉक्टराला अटक; किती लाच मागितली कळल्यावर धक्का बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 05:07 PM2019-07-26T17:07:04+5:302019-07-26T17:08:33+5:30
कुरळप पोलीस ठाण्यात चिवटेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली - आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बापू चिवटे (४६) यांना ३० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे.करळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. कुरळप पोलीस ठाण्यात चिवटेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत उपचार असतानाही सांगलीतील ऐतवडे खुर्द येथील एका रुग्णाकडे उपचारासाठी चिवटे यांनी पैशाची मागणी केली होती. संबंधित रुग्णाने सांगलीच्या एसीबीकडे यासंबंधी तक्रार केली. या तक्रारीवरुन एसीबीने आज सापळा लावला होता. दरम्यान या संबंधित रुग्णाकडून ३० रुपये स्विकारताना चिवटे याला रंगेहाथ पकडले आहे.
चिवटे हा आरोपी डॉक्टर प्रत्येक रुग्णाकडून औषधोपचार करण्यासाठी ३० रुपये आणि सलाईनसाठी प्रत्येकी १०० रुपये पैशाची मागणी करत असे. सरकारकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मोफत औषधोपचार करण्याची सुविधा असताना देखील डॉ. चिवटे हे रुग्णांकडून पैसे घेतल्याशिवाय औषधोपचार करत नाहीत. अशा प्रकारची तक्रार तक्रारदाराने दाखल केली होती. या तक्रारीची शहानिशा करून
लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पुणे विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, पोलीस निरिक्षक गुरुदत्त मोरे, जितेंद्र काळे, संजय कलगुटगी, संजय सपकाळ, अविनाश सागर, सारीका साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.