लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात; १ लाखाची लाच घेताना फौजदारास रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 07:05 PM2022-06-02T19:05:19+5:302022-06-02T19:06:27+5:30
Bribe Case : योगेश जगन्नाथ ढिकले (३२, रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड,मेहुणबारे. ता.चाळीसगाव) असे या लाचखोर फौजदाराचे नाव आहे.
चाळीसगाव जि. जळगाव : दोषारोपपत्र लवकर पाठवण्याच्या मोबदल्यात एक लाखांची लाच (Bribe) घेणाऱ्या मेहुणबारे ता. चाळीसगाव येथील पोलीस ठाण्यातील फौजदारास रंगेहाथ पकडण्यात आले. गुरुवारी दुपारी २ वाजता पोलीस (Police) ठाण्याच्या आवारातच ही कारवाई करण्यात आली. योगेश जगन्नाथ ढिकले (३२, रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड,मेहुणबारे. ता.चाळीसगाव) असे या लाचखोर फौजदाराचे नाव आहे.
तक्रारदाराविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात २९ मार्च २०२२ रोजी गुन्हा दाखल होता. याबाबत दोषारोपपत्र लवकर पाठवून मदत करायची आणि पोलीस ठाण्यात दिलेली हजेरी माफ करण्याच्या मोबादल्यात साडेचार लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. यात एक लाखाच्या रक्कमेवर तडजोड झाली. ही रक्कम ढिकले याने गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारातच घेतली आणि दुसऱ्याच क्षणाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्यावर झडप घातली.
डीवायएसपी शशिकांत एस.पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, .सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, सुनिल पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, पोना. मनोज जोशी, जनार्दन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदीप पोळ यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.