परमबीर सिंह भ्रष्टाचार आरोप प्रकरण : बार मालकाविरोधात एसीबीकडून लुक आऊट नोटीस जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 11:49 PM2021-07-27T23:49:29+5:302021-07-27T23:50:04+5:30
Corruption probe against Param Bir Singh: डांगे यांनी केलेल्या आरोपानुसार, गावदेवी परिसरात रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या 'डर्टी बन्स सोबो' या पबवर २२ नोव्हेबर २०१९ ते २३ नोव्हेबर रोजी कारवाई केली होती.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दक्षिण मुंबईतील बार मालकाविरोधात लुक आउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Corruption probe against Param Bir Singh: ACB issues lookout notice against bar owner)
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर मात्र परमबीर यांच्या विरोधातही गैरकारभार आणि भ्रष्टाचारांच्या तक्रारीचे सत्र सुरू झाले. पुढे, राज्य शासनाच्या परवानगीने एसीबीकड़ून परमबीर यांची खुली चौकशी सुरु आहे. अशात पोलीस निरिक्षक अनूप डांगे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एसीबीने दक्षिण मुंबईतील बार मालकाविरुद्ध लुक आउट नोटीस जारी केली आहे.
डांगे यांनी केलेल्या आरोपानुसार, गावदेवी परिसरात रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या 'डर्टी बन्स सोबो' या पबवर २२ नोव्हेबर २०१९ ते २३ नोव्हेबर रोजी कारवाई केली होती. कारवाई दरम्यान पबचा मालक जीतू नावलानी याने परमबीर यांच्यासोबत 'घरके रिलेशन है' असे सांगून कारवाईस विरोध केला. पुढे, तेथे धड़कलेल्या त्याच्या अन्य दोन मित्रांनी पोलिसांना दमदाटी केली. शिवाय, मारहाणही केली. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल केले. पुढे हाच गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव वाढला.
या प्रकारानंतर २५ नोव्हेबर रोजी एसीबीच्या कार्यालयातून परमबीर सिंह यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा कॉल आला मात्र याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगताच, तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी भेटीला जाण्यास नकार दिला. त्याबाबत संबधित एसीबी कार्यालयात कळविण्यात आले. त्यानंतर परमबीर सिंह यांनी आयुक्त पदाचा पदभार स्विकारताच, माझ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु झाली. पुढे ४ जुलै २०२० रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात बदली झाली. त्यापाठोपाठ १८ जुलै रोजी माझे निलंबन झाले.
याच दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबविण्यासाठी ५० लाखांची मागणी केली होती. पुढे कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी केल्याचा आरोप यात केला आहे. त्यानुसार एसीबीकड़ून अधिक तपास सुरु आहे. नुकतेच, परमबीर यांच्यासह ७ जणांविरुद्ध मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापाठोपाठ ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यातही सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.