पती जिवंत असतानाही २१ महिला झाल्या विधवा, समोर आली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:30 PM2021-07-21T16:30:39+5:302021-07-21T16:30:56+5:30
Corruption: भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि दलालांनी राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजनेमधून सरकारी पैशांवर डल्ला मारला आहे.
लखनौ - भ्रष्ट अधिकारी आणि दलालांच्या अभद्र युतीने उत्तर प्रदेश सरकारच्या अजून एका चांगला योजनेमध्ये मोठा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. यावेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि दलालांनी राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजनेमधून सरकारी पैशांवर डल्ला मारला आहे. (Corruption) या सरकारी अधिकाऱ्यांनी ३० हजार रुपयांसाठी २१ महिलांना विधवा बनवल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात या सर्व महिलांचे पती जिवंत आहे. (While her husband was alive, 21 women became widows, shocking information came to light)
उत्तर प्रदेशमध्ये सरकारने राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये दारिद्र रेषेखाली राहणाऱ्या कुटुंबातील प्रमुखाचा ६०वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला ३० हजार रुपयांची मदत सरकारकडून मिळते. भ्रष्ट अधिकारी आणि दलालांनी गरीब विधवा महिलांना मिळणाऱ्या याच ३० हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारला आहे.
चित्रकुट, बलरामपूर, गोरखपूर, कानपूरमध्ये या योजनेत घोटाळा झाल्याच्या तक्रारी याआधीच येत होत्या. आता लखनौमधील दोन ठिकाणांहून अशाच प्रकरणांचा उलगडा झाला आहे. येथे २१ असे बोगस लाभार्थी मिळाले आहेत. ज्यांचे पती जिवंत असतानाही त्यांना या योजनेचा लाभ मिळालाआहे. तसेच त्यांच्या खात्यात ३० हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लखनौच्या सरोजिनीनगर तालुक्यातील बंथरा आणि चंद्रावल गावामध्ये २०१९-२० आणि २०-२१ मध्ये एकूण ८८ जणांनी या योजनेचा लाभ घेतला होता. प्राथमिक तपासामध्ये या लाभार्थ्यांमधील २१ महिला अशा होत्या ज्यांचे पती जिवंत होते. तसेच या महिलांना बनावट पद्धतीने लाभ देण्यात आला होता.
या बनावट लाभासाठी दलाल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे कमिशन ठरलेले होते. लाभार्थी महिलेला या ३० हजार रुपयांमधील १० ते १५ हजार रुपयेच मिळाले. बाकी रक्कम दलाल आणि अधिकाऱ्यांनी गडप केले. मात्र असा घोटाळा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही गोरखपूर, बलरामपूर, चित्रकूट, कानपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये असा गडबड घोटाळा झाल्याचे समोर आले होते. तिथे स्थानिक प्रशासनाने विभागीय कर्मचाऱ्यांचे निलंबनही केले होते.