कॉसमॉस बँक सायबर हल्ला; इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस, मुख्य सूत्रधार दुबईत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 07:31 IST2020-08-28T03:18:34+5:302020-08-28T07:31:28+5:30
९४ कोटी रुपये लुटून नेले, भारतातील ४१ शहरांमधील ७१ बँकांच्या एटीएममधून अडीच कोटींची रक्कम काढण्यात आली होते

कॉसमॉस बँक सायबर हल्ला; इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस, मुख्य सूत्रधार दुबईत
विवेक भुसे
पुणे : जगभरात खळबळ उघडून देणाऱ्या कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणात तब्बल २ वर्षांनंतर इंटरपोलने भारतातील रुपे कार्डमार्फत पैसे काढणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधाराविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्विच (सर्व्हर)चा प्रॉक्सी स्विच उभारुन सायबर हल्ला करुन हॅकरने २८ देशातून एकाच वेळी एटीएममधून ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटून नेले होते़ त्यातील भारतात रुपे डेबीट कार्डधारकांची माहिती चोरुन त्यांचे क्लोन करुन पैसे काढण्यात आले होते.
भारताबरोबरच जगभरातील २८ देशांमधील एटीएममधून ११ व १३ ऑगस्ट २०१८ रोजी एटीएममधून ९४ कोटी ४२ लाख रुपये काढण्यात आले होते़ त्यात भारतातील विविध शहरांमधून रुपे डेबीड कार्डच्या माध्यमातून २ हजार ८४९ व्यवहारांद्वारे २ कोटी ५० लाख रुपये काढण्यात आले होते़ रुपे कार्डधारकांची माहिती चोरुन त्यांचे क्लोन करुन बनावट कार्ड पुरविण्याचे काम या सुत्रधाराने केले होते़ हा सुत्रधार सध्या दुबई येथे असल्याची पोलिसांची माहिती आहे.
याबाबत आर्थिक व सायबर क्राईमचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, गेल्या किमान एक वर्षांहून अधिक काळ आम्ही इंटरपोलशी संपर्कात असून त्यांनी भारतातील सर्व व्यवहारामागील मुख्य सुत्रधाराच्या नावाने रेड कॉर्नर नोटीस काढली आहे़ सध्या तो दुबईत असल्याचे सांगितले जात आहे. कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्याप्रकरणात आतापर्यंत प्रत्यक्ष पैसे काढणारे व त्यांच्याशी संबंधित असलेल्या १८ जणांना अटक करण्यात आली आहे़ हा सुत्रधार मुळचा मुंब्रा येथील राहणारा असून त्याने भारतात विविध शहरांमधील एटीएम सेंटरमधून जे पैसे काढले गेले़ त्यांना क्लोन केलेले कार्ड व पासवर्ड पुरविल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे़
जगभरातील विविध देशांमधून व्हिसा कार्डमार्फत जे पैसे काढले गेले, त्याचे हॅकर वेगळे आहेत़ या सर्व व्यवहारांची माहिती सायबर पोलिसांकडे एकत्रित करण्यात आली असून त्यातून या परदेशातील व्यवहारामागील मुख्य सुत्रधारांचे व्हेरिफिकेशन काम सुरु आहे़
हाँगकाँगमधील बँंकेत गोठविले गेलेल्या ११ कोटी रुपयांपैकी ५ कोटी रुपये परत मिळविण्यात यश आले आहे.
कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करुन भारतातील ४१ शहरांमधील ७१ बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यात आले होते़ त्यातील सर्वाधिक ८९ लाख रुपये कोल्हापूर येथील एटीएममधून काढले गेले होते़ त्याची संपूर्ण तांत्रिक माहिती गोळा करुन पुण्यातील सायबर पोलिसांनी सर्वप्रथम कोल्हापूरमधून प्रत्यक्ष पैसे काढणाऱ्यांना अटक केली होती़
उत्तर कोरियाच्या हॅकरचा हात नाही
कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरियाच्या हॅकरचा हात असल्याचा दावा अमेरिकेतील एका एजन्सीने केला होता़ मात्र, आतापर्यंतच्या तपासात उत्तर कोरियातील हॅकरचा यात हात नसल्याचे निष्पन्न झाल्याचे संभाजी कदम यांनी सांगितले.