रावेर दंगलीतील नुकसानीचा खर्च आरोपींकडून होणार वसूल, प्रस्ताव सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 12:21 AM2020-07-09T00:21:32+5:302020-07-09T00:22:55+5:30
संपूर्ण देशात २२ मार्च रोजी जनता संचारबंदी लागू असताना रावेर येथे दोन गटात दंगळ उसळली होती. त्यात एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते.
जळगाव- रावेर येथे २२ मार्च रोजी उसळलेल्या दंगलीत झालेले नुकसान गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींकडून वसूल करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस विभागाने जिल्हाधिका-यांकडे सादर केला आहे. मुंबई पोलीस अधिनियमातील तरतूदीच्या आधारावर महाराष्टÑात प्रथमच असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ६ कोटी २० लाख ९१ हजार ५५ रुपयांचे नुकसान या दंगलीच झाल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम उपस्थित होते.
संपूर्ण देशात २२ मार्च रोजी जनता संचारबंदी लागू असताना रावेर येथे दोन गटात दंगळ उसळली होती. त्यात एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. सरकारी व खासगी मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निष्पाप लोकांना या दंगलीची झळ बसली होती. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम,रावेरचे निरीक्षक रामदास वाकोडे व उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे यांनी रावेर दंगलीचा अभ्यास करुन तेथील संवेदनशील भाग अशांत म्हणून घोषीत करण्याबाबत जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव सादर केला आहे.
काय आहे कायदा
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५१ (३) (१) व ५१ (४) (ब)अन्वये दंगलीत किंवा एखाद्या आपला हेतू साध्य करण्यासाठी हानी तसेच कोणाचा मृत्यू झाला असेल तर संबंधितांकडून त्याची नुकसान भरपाई करण्याची तरतूद आहे. ही नुकसान भरपाई वैयक्तिक किंवा विविध कराच्या माध्यमातून पालिकेने वसूल करायची व वसुल रकमेचे वाटप मृत व्यक्ती, नुकसान झालेल्या संस्था, वाहने याचे वर्गीकरण करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना आहेत. पोलीस दलाने कायद्याचा आधार घेऊन हा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.
रावेरात ७४ वर्षात ४२ दंगली
रावेर शहरात १९४६ ते मार्च २०२० या कालावधीत ७४ वर्षात धार्मिक तेढ निर्माण करणा-या तब्बल ७४ दंगली झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. प्रत्येक दंगलीत गुन्हे दाखल करणे, आरोपी अटक करणे, त्यांना कारागृहात पाठविणे व कायद्यान्वे शिक्षा या प्रचलित कायद्यान्वये कारवाई केली गेली आहे. आता प्रथमच नुकसान करणा-यांकडून त्याची वसुली करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
या गुन्ह्यात निष्पन्न व अटक झालेल्या काही आरोपींवर मागील रेकॉर्ड बघून एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. दंगलीमुळे काय नुकसान होते, दंगेखोरांमध्ये वचक बसावा यासाठी त्यांच्याकडूनच त्याची वसूली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायद्यात देखील तशी तरतूद असून त्याचाच आधार घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक
रावेर दंगल दृष्टीक्षेपात
मयत : १ पुरुष
गंभीर जखमी : २ पुरुष
एकुण आरोपी : ३७७
अटक आरोपी : १५३
एकुण गुन्हे : ७
दोषारोपपत्र दाखल : १६ जून २०२०
पोलीस बंदोबस्त खर्च : ६ कोटी १४ लाख ९२ हजार ५९
जाळपोड व तोडफोड नुकसान : ५ लाख २१ हजार
पालिकेचा व्यवस्थापनात झालेला खर्च : ७७ हजार
महावितरण कंपनीचे नुकसान : १ हजार