बनावट दारु तस्करी, पंचायत समिती सदस्याला अटक
By सुनील पाटील | Published: March 6, 2023 10:46 PM2023-03-06T22:46:34+5:302023-03-06T22:47:41+5:30
या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्यांचा आकडा २३ वर पोहचला आहे.
जळगाव : पारोळा येथे उद्ध्वस्त झालेल्या बनावट दारु कारखान्याचे धागेदोरे दारु बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. या साखळीतील वर्धा जिल्ह्यातील मुख्य तस्कर प्रशांत तानबाजी चंदनखेडे (वय ४०, रा.अल्लीपूर, ता.हिंगणघाट, जि.वर्धा) याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव व नाशिकच्या पथकाने अटक केली. चंदनखेडे हा हिंगणघाट पंचायत समितीचा सदस्य आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्यांचा आकडा २३ वर पोहचला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त अ.ना.आहोळ व जळगावचे अधीक्षक जितेंद्र गोगावले यांच्या पथकाने २४ डिसेंबर रोजी पारोळा येथे बनावट दारुचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. या कारवाईत १ कोटी ६४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. बनावट दारुचा मास्टरमाईंड समाधान चौधरी याच्यासह २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
अधिकच्या चौकशीत येथे दारु तयार करुन ती दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात तस्करी केली जात होती. हिंगणघाट पंचायत समितीचा सदस्य प्रशांत चंदनखेडे हा वर्धा जिल्ह्यात ही दारु किरकोळ विक्रेत्यांकडे पोहचत होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागनाशिकचे निरीक्षक अरुण चव्हाण व जळगाव येथील निरीक्षक सी.एच.पाटिल यांचे पथक वर्धा जिल्ह्यात गेले होते. चंदनखेडे याला अल्लीपूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला जिल्ह्यात आणून न्यायालयात हजर केले असता ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.