सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची दाम्पत्याकडून अडीच कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 01:20 AM2020-12-09T01:20:29+5:302020-12-09T07:46:55+5:30
Crime News : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची अडीच कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण पुढे आले आहे.
नागपूर - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची अडीच कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. सीताबर्डी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा यासंदर्भातील प्रकरण दाखल करून गुन्हेगाराला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव तापस घोष असे आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोबडे कुटुंबीयांची आकाशवाणी चौकात वडिलोपार्जित स्थावर संपती आहे. त्यावर सीझन लॉन तयार केलेले आहे. मागील सुमारे १० वर्षापूर्वी तापस घोष याला हे लॉन चालविण्यासाठी दिले होते. यापासून मिळणाऱ्या किरायाचा हिशेब तापस घोष आणि त्याची पत्नी ठेवायचे. या लॉनची मालकी शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांच्या नावे आहे. त्या बऱ्याच वयोवृद्ध आणि आजारी आहेत. घोष दाम्पत्याने मुक्ता बोबडे यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन लॉनच्या किरायापोटी वसूल करण्यात आलेल्या रकमेत हेराफेरी केली. त्यांनी बनावट पावत्या तयार करून रक्कम हडपली.
मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. काही दिवसांपूर्वी ही फसवणूक बोबडे कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी घोष दाम्पत्याची चौकशी केली असता कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार केल्याची बाब पुढे आली. या आधारावरून मंगळवारी रात्री उशिरा सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.