विदर्भ एक्स्प्रेससमोर युगुलाची आत्महत्या, दोघेही अनोळखी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 02:37 PM2022-10-21T14:37:51+5:302022-10-21T14:38:11+5:30
दोघांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.
शेगाव (बुलढाणा) : २५ व २० वर्षीय अनोळखी तरुण-तरुणीने गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान शेगाव-नागझरी लोहमार्गावर विदर्भ एक्स्प्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनोळखी तरुण-तरुणीची ओळख पटविण्याचे आवाहन शेगाव रेल्वे पोलिसांनी केले आहे.
याबाबत शेगाव रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ९.३० वाजता गोंदियावरून मुंबई जाणारी विदर्भ एक्स्प्रेस शेगावकडे येत होती. त्यावेळी शेगाव नागझरीदरम्यानच्या लोहमार्गावरील २५ वर्षीय युवक, २० वर्षीय तरुणीने उडी मारून आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. युवकाचा चेहरा चेंदामेंदा झाला. रंग निमगोरा, अंगामध्ये निळ्या रंगाची फुलपँट, निळ्या रंगाची बनियन, लाल रंगाची निकर असे वर्णन आहे. तरुणीचा रंग नीमगोरा, चेहरा गोल, सडपातळ बांधा, केस काळे, अंगामध्ये पोपटी रंगाची कुर्ता व काळ्या रंगाची लेगीज असे वर्णन आहे. मृतांची ओळख पटविण्याचे आवाहन शेगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे हवालदार पंचकृष्ण खिराडे ऊर्फ बाळू मेजर यांनी केले आहे.