प्रेमीयुगुलाने ट्रेनसमोर उडी मारून संपवले जीवन; लग्नासाठी कुटुंबीयांचा होता विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 09:16 PM2021-12-31T21:16:02+5:302021-12-31T21:16:51+5:30
Suicide Case : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दोघांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर दोघांच्याही कुटुंबात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील औरैया येथे एका प्रेमीयुगुलाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. रात्रीच दोघेही घरातून गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही बेपत्ता झाल्याची माहिती नातेवाइकांनी पोलिसांना तोंडी तक्रार दिली. सकाळी दोघांचे मृतदेह रुळावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दोघांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर दोघांच्याही कुटुंबात खळबळ उडाली आहे.
प्रेमी युगुलाने रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले
ही घटना औरैया जिल्ह्यातील अछलदा पोलीस स्टेशन हद्दीतील घसरा रेल्वे स्थानकाजवळ घडली. शुक्रवारी सकाळी गावाजवळील कसारा स्टेशनजवळ दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावर दोघांचे मृतदेह पडलेले आढळून आले. तरुणी खुमानपुरा, अछलदा येथील रहिवासी होती, तर जितेंद्र कुमार हा तरुण अछलदा येथील रहिवासी होता. दोघेही एकमेकांना आधीच ओळखत होते.
कुटुंब लग्नासाठी तयार नव्हते
दोघांना लग्न करायचे होते असे सांगितले जात आहे. मात्र कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. दोघांनीही अनेकवेळा घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण कोणीही ऐकले नाही आणि शेवटी दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सकाळी दोघांचे मृतदेह रेल्वे रुळावर पडलेले आढळून आले. स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांची ओळख पटली.
पोलीस या प्रकरणाच्या तपासात
या घटनेबाबत पोलीस अधीक्षक अभिषेक वर्मा यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. दोघांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे. शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.