बँक खात्यात चुकून आले ४० लाख अन् नवरा-बायको 'कर्माने' गेले तुरुंगात!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 05:35 PM2019-09-18T17:35:29+5:302019-09-18T17:39:47+5:30
सोमवारी कोर्टाने त्या दाम्पत्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली.
तिरुपुर - २०१२ मध्ये तिरुपूरचे जीवन विमा एजंट वी. गुनसेकरन यांच्या बँक खात्यात चुकून 40 लाख रुपये आले होते. तेव्हा ते बँक खात्यात कसे आले हे जाणून न घेता त्यांनी आणि पत्नी राधाने दुसर्याच्या पैशाने प्रॉपर्टी खरेदी केली आणि मुलीचे लग्न केले. मात्र, आता त्यामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. सोमवारी कोर्टाने त्या दाम्पत्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा होता निधी
वास्तविक हे पैसे खासदार आणि आमदार यांच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार होते, परंतु अधिकाऱ्यांनी डिमांड ड्राफ्टवर चुकून मागणीच्या आराखड्यावर कार्यकारी अभियंताऐवजी गुनसेकरन यांचा खाते क्रमांक दिला. तिरुपुरातील कॉर्पोरेशन बँकेच्या मुख्य शाखेत या अभियंता आणि गुनसेकरन या दोघांचे खाते होते. पैसे हस्तांतरित झाल्यानंतर आठ महिन्यांनंतर खात्यात पैसे येत नसल्याचे अधिकाऱ्यांना जेव्हा समजले. तेव्हा त्यांनी बँकेसमोर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यावेळी असं समजले की डिमांड ड्राफ्टवर लिहिलेल्या अकाउंट नंबरवर ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे.
पैसे परत करण्याची केली बतावणी
जेव्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी गुनसेकरांचे खाते तपासले तेव्हा त्यांना आढळले की त्यांनी पैसे मिळाल्यानंतर काही दिवसातच खर्च केले. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुनसेकर यांना पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, ते पैसे पार्ट करू शकले नाहीत. त्यानंतर २०१५ मध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक नरसिंह गिरी यांनी गुनसेकरनविरोधात शहरातील मध्यवर्ती गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली
कोर्टात सिद्ध झाला घोटाळा
गुन्हे शाखेने गुनसेकरनवर आणि त्याच्या पत्नीविरोधात भा. दं. वि. कलम 3०3 आणि १२० बी अंतर्गत गुन्हा दाखल केला. या जोडप्याने अटकपूर्व जामीन घेतला. यासंदर्भात फिर्यादीचे वकील इब्राहिम राजा यांनी सांगितले की, गुनसेकरन यांनी आपण ही रोकड बँकेत परत करणार असल्याचे लेखी पत्रात दिले होते . मात्र, वारंवार विनंती करूनही त्यांनी परत केले नाही. फिर्यादीने हे सिद्ध केले, त्यानंतर कोर्टाने त्या दाम्पत्याला तीन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आणि कोईम्बतूर जिल्हा कारागृहात पाठविले.