जादूटोण्याच्या संशयावरून आदिवासी दाम्पत्याचा खून, आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 12:50 AM2018-11-10T00:50:41+5:302018-11-10T00:51:02+5:30
औढे (ता. खेड) येथे जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून कातकरी समाजातील दाम्पत्याचा निर्घृण खून करण्यात आला. या आदिवासी पती-पत्नीवर झोपेतच सपासप वार करण्यात आले.
पाईट : औढे (ता. खेड) येथे जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून कातकरी समाजातील दाम्पत्याचा निर्घृण खून करण्यात आला. या आदिवासी पती-पत्नीवर झोपेतच सपासप वार करण्यात आले. या दुहेरी हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नवसू पुणाजी वाघमारे (वय ५५), लीलाबाई सुदाम मुकणे (वय ५०) अशी खून झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याबाबत लीलाबाईचा मुलगा राजू सुदाम मुकणे (वय २२) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : औढे येथील गायमाळवस्तीजवळील महारदरा परिसरात कोंडिबा देवजी गायकवाड यांच्या मालकीच्या रानात हे दाम्पत्य गवताच्या झोपडीमध्ये राहत होते. बुधवारी घरामध्ये झोपलेले असतानाच रात्री ११ च्या सुमारास धारदार हत्याराने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
त्यांची झोपडी निर्जन ठिकाणी आहे. त्यामुळे या हत्याकांडाची माहिती सकाळपर्यंत उजेडातच आलेली नव्हती. सकाळी आठच्या सुमारास मारुती शंकर शिंदे दूध घालण्यासाठी जात असताना त्यांना वाघमारे यांचा मृतदेह अंथरुणामध्येच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. लीलाबार्इंचा मृतदेह औढे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विवस्त्रावस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ हा प्रकार पोलीसपाटील विलास बारकू शिंदे व उपसरपंच धोंडिभाऊ शिंदे यांना कळविला. याबाबत खेड पोलिसांना तत्काळ माहिती कळविण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव
घेत पंचनामा केला. दोघांच्याही डोक्यात, हातावर, तसेच पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खुणा होत्या. नवसू वाघमारे यांच्याबरोबर लीलाबार्इंचा दुसरा विवाह झालेला आहे. दुसरा विवाह होऊनही त्या पहिल्या पतीचेच नाव लावत होत्या.
लीलाबाई या मांत्रिक होत्या. त्यापूर्वी कोहिंडे (ता. खेड) येथे राहत होत्या. येथील काही लोकांना त्या जादूटोणा करतात, याचा राग होता. यावरून त्यांना गावामध्ये ठराविक लोकांकडून सतत शिवीगाळ केली जात होती. त्याला कंटाळून त्यांनी गावच बदलले होते. राजू याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे.
आरोपी ताब्यात
फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे पोलिसांनी जयतु चिंधू बोरकर, लक्ष्मण चिंधू बोरकर व बबन एकनाथ मुकने यांना ताब्यात घेतले आहे. आरोपी लीलाबाई जादूटोणा करते तसेच तिच्यामुळे गावातील मुले मेल्याच्या समजातून सतत शिवीगाळ करायचे. याच कारणाहून त्यांनी आई व सावत्र वडील यांचा खून केल्याचा संशय व्यक्त केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत.