दुचाकीवरुन घरी परतणाऱ्या जोडप्याला बेदम मारहाण; विरोध केल्यानंतर पत्नीवर सामुहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 07:08 PM2021-09-09T19:08:51+5:302021-09-09T19:09:37+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. हे दाम्पत्य लग्नाच्या समारंभातून घरी परतत होते.
गुंटूर - आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात गँगरेपची खळबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी मेडिकोंडुरू बायपास रोडवर एका महिलेवर काही जणांनी सामुहिक बलात्कार केला आहे. त्याचसोबत महिलेच्या बेदम मारहाणही केली आहे. त्यानंतर टोळक्यांनी दाम्पत्याला लुटून तेथून फरार झाले. सध्या या दाम्पत्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप असल्याने लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. हे दाम्पत्य लग्नाच्या समारंभातून घरी परतत होते. बाइकवरुन ते सत्तेनापल्ली इथं जात होते. पलाडुगु चौकाजवळ काही लोकांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्यानंतर दाम्पत्याला मारहाण केली. त्यांच्याकडून पैसे आणि सोनं लुटून घेतलं. त्यानंतर महिलेला खेचत बाजूच्या शेतात घेऊन गेले. ज्याठिकाणी आरोपींनी महिलेवर सामुहिक बलात्कार केला.
मध्यरात्री गुन्हा नोंद
घटनेनंतर रात्री दाम्पत्य तक्रार नोंदवण्यासाठी सत्तेनापल्ली येथील पोलीस ठाण्यात पोहचले परंतु हा गुन्हा आमच्या हद्दीत घडला नसून तुम्हाला मेडिकोंडरु पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागेल असं सांगून तेथून पाठवले. त्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून जखमी अवस्थेतील दाम्पत्याला गुंटूरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
घटनेनंतर राज्यभरात संताप
याच दरम्यान पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार घटनास्थळानजीक कोल्ड स्टोरेजमध्ये काम करणाऱ्या काही लोकांची चौकशी केली जात आहे. या घटनेनं राज्यात संतापाची लाट उसळली आहे. घटनेचा निषेध करत विरोधी पक्ष टीडीपीचे राष्ट्रीय महासचिव नारा लोकेश यांनी गुन्हे क्षेत्राची हद्द पाहून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास निष्काळजीपणा केला त्यावरून टीका करत दोषी पोलिसांना निलंबित करा असा आदेश दिला आहे.