हॉटेलमधून दाम्पत्याने चोरल्या दारूच्या बाटल्या; एका बाटलीची किंमत ऐकून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 09:42 AM2021-11-02T09:42:27+5:302021-11-02T09:43:48+5:30
Couple steals 45 wine bottles : ही घटना स्पेनमधील एट्रिओ नावाच्या प्रसिद्ध हॉटेलमधील आहे. हे हॉटेल आपल्या किंमती वाइन संग्रहासाठी (Wine Collection) प्रसिद्ध आहे.
माद्रिद : स्पेनमधील (Spain) एका हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरी केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये थांबलेल्या एका दाम्पत्याने (Couple) ही चोरी केल्याचे म्हटले जात आहे. आरोपी दाम्पत्याने सुमारे 45 दारूच्या बाटल्या चोरल्या, ज्यामध्ये एक 215 वर्षे जुनी बाटली सुद्धा होती. या जुन्या बाटलीची किंमत तीन कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. (Couple steals 45 wine bottles, including bottle worth ₹3 cr from Spain hotel)
ही घटना स्पेनमधील एट्रिओ नावाच्या प्रसिद्ध हॉटेलमधील आहे. हे हॉटेल आपल्या किंमती वाइन संग्रहासाठी (Wine Collection) प्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये एक दाम्पत्य राहण्यासाठी आले होते. या दाम्पत्याने संधी मिळताच हात साफ केला. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हे दाम्पत्य हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होते, त्यावेळी त्यांनी या दारूच्या बाटल्यांची चोरी केली.
या दाम्पत्याने दारूच्या बाटल्या इतक्या चलाखीने चोरल्या की हॉटेल कर्मचाऱ्यांना अजिबात संशय आला नाही. विशेष म्हणजे सुरक्षा कॅमेऱ्यांकडेही कोणाचे लक्ष गेले नाही. यानंतर दोघेही मोठ्या आरामात हॉटेलमधून बाहेर पडले. काही वेळाने बाटली जागेवर न दिसल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले, ज्यामध्ये हे दाम्पत्य चोरी करताना दिसले. यामध्ये एकच नव्हे तर 45 बाटल्या हळूहळू चोरीला गेल्याचेही स्पष्ट झाले.
19 व्या शतकातील काही बाटल्या
चोरीच्या काही बाटल्या १९व्या शतकातील असल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यामधील एका वाईनच्या बाटलीची किंमत तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या सर्व बाटल्या या हॉटेलचे खास संग्रह होते आणि अतिशय नीटनेटकेपणे सजवल्या होत्या. दुसरीकडे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप आरोपींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.