खळबळजनक! दाम्पत्याचे मृतदेह आढळले घरात, विष पिऊन आत्महत्या केल्याच्या चर्चेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 20:30 IST2020-11-19T20:20:40+5:302020-11-19T20:30:46+5:30
Crime News : वसई पूर्वेकडील भोयदापाडा येथील घटना

खळबळजनक! दाम्पत्याचे मृतदेह आढळले घरात, विष पिऊन आत्महत्या केल्याच्या चर्चेने खळबळ
वसई पूर्वेकडील भोयदापाडा येथे राहणाऱ्या दाम्पत्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वालीव पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नेमका हा मृत्यू कशामुळे झाला, हे फॉरेन्सिक रिपोर्टचा अहवाल आल्यावर कळणार आहे.
वसईच्या पूर्वेकडील भोयदापाडा येथील मराठी शाळेजवळ राहणाऱ्या पटेल दाम्पत्याने कोणत्या तरी कारणावरून विष पिऊन आत्महत्या केल्याच्या चर्चेने परिसरात खळबळ माजली आहे. कृष्णा पटेल (३२) आणि प्रभाती पटेल (३०) असे या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांना दोन वर्षांचा एक मुलगा असल्याचेही कळते. हे दोघेही घरामध्ये पडलेल्या अवस्थेत मंगळवारी आढळल्यावर आजूबाजूच्या लोकांनी त्यांना वसईच्या महानगरपालिकेच्या सर डी.एम. पेटिट रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण, प्रभाती हिचा उपचाराआधीच मृत्यू झाला, तर पती कृष्णा याला उपचारासाठी दाखल केले. त्याचा बुधवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वसई पोलीस ठाण्यातून कागदपत्रे आल्यावर वालीव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.