Court: भ्रष्टाचाराचे आरोप; एटीएस अधिकारी निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 02:57 AM2022-09-02T02:57:46+5:302022-09-02T02:59:29+5:30
Court: उच्च न्यायालयाने मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण खानविलकर यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. २०१० मध्ये भ्रष्टाचारप्रकरणी अटक होण्यापूर्वी त्यांनी मालेगावचे २००८ चे बॉम्बस्फोट प्रकरण, औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण व २००६ च्या रेल्वे स्फोट प्रकरणाचा तपास केला होता.
मुंबई : उच्च न्यायालयानेमुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण खानविलकर यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. खानविलकर हे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) होते. २०१० मध्ये भ्रष्टाचारप्रकरणी अटक होण्यापूर्वी त्यांनी मालेगावचे २००८ चे बॉम्बस्फोट प्रकरण, औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण व २००६ च्या रेल्वे स्फोट प्रकरणाचा तपास केला होता.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, खानविलकर आणि अन्य दोघांनी २६ आणि २७ डिसेंबर २००९ च्या मध्यरात्री एटीएसच्या पथकाने मुंबईतील मुलुंड परिसरातील एका क्लबवर छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने लॉटरी व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीसह काही लोकांना ताब्यात घेतले आणि त्यांना एटीएसच्या काळाचौकी पोलीस ठाण्यात नेले. लॉटरी विक्रेत्याने याबाबत तक्रार दिली, असे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे.
तक्रारदारावर प्राणघातक हल्ला करून प्रकरणातून सोडण्यासाठी पोलिसांनी २० लाखांची मागणी केली. खानविलकर यांनी तक्रारदाराला इतर प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी दिली, असा आरोप सरकारी वकिलांनी केला. तडजोडीनंतर खानविलकर यांनी १० लाख रुपये मागितले. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये द्यायची होती.
२०१३ मध्ये सत्र न्यायालयाने खानविलकर यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली, तर त्यांच्या दोन साथीदारांना १० महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात खानविलकर व त्यांचे दोन साथीदार उच्च न्यायालयात गेले होते. खानविलकर यांनी लाच मागितल्याचा पुरावा खटल्यातून गायब आहे, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. त्यानंतर आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यात सरकारी वकील अयशस्वी ठरले असून, आरोपींची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचे न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने सांगितले.