फैजपूरच्या तत्कालीन उप अधीक्षकांवरील आरोपाच्या चौकशीचे कोर्टाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 11:18 PM2021-10-12T23:18:33+5:302021-10-12T23:20:01+5:30
तरुणीवर अत्याचार प्रकरणात आरोपीस मदत केल्याची तक्रार
रावेर : गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्यास आरोपीला मदत केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात फैजपूरचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या विरुद्धच्या अर्जानुसार तपास करावा, असा आदेश येथील न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.
तालुक्यातील खानापूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने २१ वर्षीय नितीन शेंडे यांनी तरूणीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी आरोपीला पुरावा नष्ट करण्यासाठी पीडितेच्या मोबाईलमधून मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ व संदेश खोडून पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीस मदत केल्याचा आरोप पीडितेचा आहे.
याबाबत पिंगळे यांच्यावरील गंभीर आरोपांसंबंधी गुन्हे प्रक्रिया संहिता अन्वये दाखल अर्जाचा तपास करण्यात यावा असे आदेश रावेर दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश न्या.अनंत बाजड यांनी ८ ऑक्टोबर रोजी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना पारीत केले आहे. या न्यायालयीन आदेशाची साक्षांकित केलेली सत्यप्रत मंगळवारी प्राप्त झाल्याची माहिती पीडितेचे वकील ॲड. नितीन भावसार यांनी दिली.