गुंगीचे औषध पाजून चुलत दिरानेच केला महिलेवर बलात्कार, व्हिडीओ केला नातेवाईकांना शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 10:09 AM2021-02-10T10:09:41+5:302021-02-10T10:09:51+5:30
Crime News : पीडित ३० वर्षीय महिलेने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी - उसाच्या रसातून गुंगीचे औषध पाजून चुलत दिराने महिलेवर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्या कृत्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते पीडित महिला व तिचा पती, इतर नातेवाईक तसेच मित्र मैत्रिणींना व्हाटसअपद्वारे पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली आहे.
पीडित ३० वर्षीय महिलेने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ९) फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी महिलेच्या चुलत दिराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिचा पती यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे फिर्यादी विभक्त राहत होत्या. दरम्यान आरोपी हा फिर्यादी महिलेच्या घरी आला असता त्याने उसाच्या रसातून गुंगीचे औषध पाजून फिर्यादी महिलेवर बलात्कार केला. तसेच त्या कृत्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानंतर फिर्यादी महिला व तिचा पती, इतर नातेवाईक व मित्र मैत्रिणींना व्हाटसअपद्वारे तो व्हिडीओ पाठवून महिलेची बदनामी केली.