शेतीच्या वादातून चुलत भावाची हत्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 03:32 PM2020-11-20T15:32:53+5:302020-11-20T15:35:22+5:30
Washim Crime News रवी प्रल्हाद सरनाईक (३५) असे मृतकाचे नाव असून, अन्य दोन जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : शेतीच्या जून्या वादावरून झालेल्या हाणामारीत सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू झाल्याची घटना रिसोड तालुक्यातील कवठा (सरनाईक) येथे १९ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. रवी प्रल्हाद सरनाईक (३५) असे मृतकाचे नाव असून, अन्य दोन जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी अद्याप फरार आहे.
कवठा येथील अनिता व रवी सरनाईक या दाम्पत्याची गावालगत दीड एकर शेती असून त्यांच्या शेजारीच नारायणराव माणिकराव सरनाईक यांचे शेत आहे. अनिता सरनाईक यांचे ते नात्याने चुलत सासरे तर रवी सरनाईक यांचे काका आहेत. नारायणराव सरनाईक यांची शेती त्यांचा मुलगा राजु हा करतो. राजु सरनाईक हा वहिनी अनिता सरनाईक, चुलत भाऊ रवी सरनाईक, संजय सरनाईक यांना शेतीच्या कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नेहमी शिविगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. राजु सरनाईक याने १९ नोव्हेंबर रोजी दुपारी येऊन घरी येऊन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी अनिता सरनाईक यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने काही न ऐकता गणेश नामदेव सावसुंदर (३४) व गोपाल प्रकाश कोल्हे (२६) दोघेही रा. कवठा यांना सोबत घेऊन रवी सरनाईक यांना जबर मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी संजय सरनाईक व प्रल्हाद सरनाईक हे आले असता त्यांनादेखील मारहाण केली.यादरम्यान गावातील प्रतिष्ठित लोकांनी भांडण सोडविले; मात्र या मारहाणीत रवी सरनाईक हे गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता, प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचारानंतर वाशिम येथील खासगी रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने अकोला जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान प्रकृती जास्तच खालावल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी रवी सरनाईक यांना मृत घोषित केले.याप्रकरणी अनिता रवी सरनाईक यांच्या फिर्यादीवरून रिसोड पोलिसांनी तीन आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३०२, ३२५, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपी फरार असून पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.