कोविड योद्धा नर्सने चोरट्याचा प्रयत्न ठरवला निष्फळ; डहाणू रेल्वे स्थानकात केली चोरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 01:06 PM2021-06-23T13:06:14+5:302021-06-23T13:10:02+5:30
नर्सने यशस्वी मुकाबला करीत त्याचा चोरीचा प्रयत्न निष्फळ ठरवला.
पालघर : सोमवारी रात्री उशीरा धावत असलेल्या विरार-डहाणू मेमू गाडीच्या लेडीज कोचमध्ये प्रवेश करीत असलेल्या सुखराम जंगू गणवा (२२) या मध्य प्रदेशमधील झाबुवा येथील आरोपीने डब्यात एकटीच प्रवास करणाऱ्या २८ वर्षीय कोविडयोद्धा नर्सच्या हातातून मोबाइल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या नर्सने यशस्वी मुकाबला करीत त्याचा चोरीचा प्रयत्न निष्फळ ठरवला. गाडी डहाणू रेल्वे स्थानकात पोचल्यानंतर त्या महिलेने मदतीसाठी हाका मारल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत असलेल्या २८ वर्षीय तरुणीने विरार येथून डहाणूकडे जाणारी मेमू लोकल पकडली. ही लोकल वाणगाव स्थानकात पोचल्यानंतर ती बसलेल्या महिला डब्यातील सर्व महिला प्रवासी उतरून गेल्या. गाडी सुरू झाल्यावर धावती ट्रेन एका तरुणाने पकडून महिलांच्या डब्यात प्रवेश केला. गाडीने वेग घेतल्यावर नर्स आपल्या मोबाइलवर बोलत असताना त्या महिलेच्या हातातील मोबाइल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न आरोपीने केला. पण त्या नर्सने धाडसाने आरोपीशी सामना करीत त्या आरोपीला पकडून ठेवले.
थोड्याच वेळात डहाणू स्थानक आल्यावर आपण पकडले जाऊ या भीतीने त्या आरोपीने त्या नर्सच्या हाताला चावा घेत आपली सुटका करून घेतली. डहाणू स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर धावत्या लोकलमधून उडी घेत तो पळून जात असताना जखमी झालेल्या त्या नर्सने जोरजोरात ओरडून त्या आरोपीला पकडण्यासाठी मदत मागितली. तेव्हा डहाणू स्थानकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करीत त्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले.