आंतरराष्ट्रीय बाजारात 'या' ड्रग्जची क्रेझ वाढली; कुरिअरच्या मदतीने होतेय तस्करी; असं आहे मुंबई कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 01:12 PM2021-12-16T13:12:17+5:302021-12-16T13:13:27+5:30
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये या ड्रग्जला बंदी आहे. त्यात मुंबईत हे ड्रग्ज तयार करून पाठविण्यात येत आहे.
मुंबई- थर्टी फर्स्ट तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एनसीबी अधिक अलर्ट झाली आहे. यातच, कोकेनप्रमाणेच घातक असलेले ॲम्फेटामाइन ड्रग्ज डोकेवर काढत असून त्यावर रोख लावण्याचे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची वाढती क्रेझ लक्षात घेता, हे ड्रग्ज मुंबईत तयार करून व्हाया कुरिअर ऑस्ट्रेलियासह विविध देशात पाठविले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये या ड्रग्जला बंदी आहे. त्यात मुंबईत हे ड्रग्ज तयार करून पाठविण्यात येत आहे. हा प्रकार कुरिअर कंपनीआड सुरू असून यात मोठे रॅकेट सहभागी असल्याचा संशयही त्यांनी वर्तवला आहे. त्यानुसार, एनसीबीचे पथक अधिक तपास करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात किलोमागे 5 कोटी रुपयांना या ड्रग्जची विक्री होत आहे.
एनसीबीने गेले तीन दिवस ८ ठिकाणी सर्च ऑपरेशन करून केलेल्या कारवाईत १३ कोटी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी अटक केलेल्या परदेशी नागरिकाची अधिक चौकशी सुरू असून, अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
कुरिअर कंपन्या रडारवर
कुरिअर कंपनीद्वारे पाठविण्यात येणाऱ्या ड्रग्ज पार्सलवरील नाव, पत्ता बनावट असल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने हे ड्रग्ज लपविण्यात येतात. पहिल्यांदाच अशा प्रकारे तस्करीचे नवे फंडे समोर आल्याचे दिसून आले. त्यामुळे यात कुरिअर कंपन्यांचा काही सहभाग आहे का? याबाबत अधिक तपास सुरू असल्याचेही वानखेडे यांनी सांगितले आहे.