एमएमआरडीएचा अधिकारी क्रेडिट कार्ड फ्रॉडच्या जाळ्यात, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू
By गौरी टेंबकर | Published: October 21, 2023 05:10 PM2023-10-21T17:10:03+5:302023-10-21T17:10:50+5:30
बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या कक्ष अधिकाऱ्याला क्रेडिट कार्ड प्रोटेक्शन चार्जेस वाचवण्यासाठी मदत करण्याचे सांगत हजारोंचा चुना लावण्यात आला. याप्रकरणी त्यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
तक्रारदार सागर खुटवड (३८) हे एमएमआरडीएच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयात कक्ष अधिकारी म्हणून नोकरी करतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास त्यांना आराध्या शर्मा नावाचा महिलेने फोन करत ती आयसीआयसीआय बँकेमधून बोलत असल्याचे सांगितले. ती खुटवडना त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये प्रोटेक्शन सर्विस ऍक्टिव्ह केली असून त्यासाठी वर्षाला १७०० रुपये प्रोटेक्शन चार्जेस भरावे लागतील असे सांगत ते बंद करायचे असल्यास तुम्हाला एक ओटीपी पाठवतो. तो तुम्ही सांगा म्हणजे ती सर्विस बंद होईल जेणेकरून तुम्हाला सर्विस चार्जेसही लागणार नाही असेही तिने सांगितले.
तिच्याशी बोलताना खुटवड यांना एका मागोमाग एक आलेले पाच ओटीपीही त्यांनी विश्वासाने तिला सांगितले. त्याचा फायदा घेत खुटवड यांच्या क्रेडिट कार्डमधून जवळपास ४३ हजार रुपये काढण्यात आले. पैसे काढण्यात आल्याची माहिती त्यांनी शर्माला दिल्यावर ते पैसे अर्ध्या तासात पुन्हा तुमच्या खात्यात जमा होतील असे तिने सांगितले. मात्र पैसे जमा न झाल्याने खुटवड यांनी शर्माला फोन केला मात्र तो फोन बंद होता. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी बीकेसी पोलिसात धाव घेत कथित आयसीआयसी अधिकारी शर्माच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार भारतीय दंड संहिता कलम ४१९, ४२० तसेच महिती तंत्रज्ञानचे सह कलम ६६(सी),६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
शिक्षकालाही गंडवले!
अंधेरी पश्चिमच्या कॉलेजमध्ये शिक्षक असलेल्या सोनू कुमार यांचेही आयसीआयसीआय बँकेत खाते आहे. त्यांनाही अनोळखी व्यक्तीने क्रेडिट कार्डमधून दर महिन्याला २४०० रुपये कट होतील असे सांगत खात्यातून १९ हजार रुपये काढले. भामट्याने त्यांना बँकेचे नाव असलेली फाईल डाऊनलोड करायला सांगितली. तसेच कुमार यांच्या क्रेडिट कार्डचे लिमिटही विचारत नंतर त्यातून पैसे काढण्यात आले. या विरोधात त्यांनी १८ ऑक्टोबरला डी एन नगर पोलिसात गुन्हा दाखल करवला आहे.