नागपुरात पतसंस्थेत लाखोंची अफरातफर : एजंटवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:36 PM2020-02-21T23:36:50+5:302020-02-21T23:37:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पतसंस्थेच्या एजंटने ग्राहकांनी जमा केलेल्या लाखो रुपयांच्या रकमेची अफरातफर केल्याची घटना घडली आहे. नंदनवन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पतसंस्थेच्या एजंटने ग्राहकांनी जमा केलेल्या लाखो रुपयांच्या रकमेची अफरातफर केल्याची घटना घडली आहे. नंदनवन पोलिसांनी दोन एजंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोनू सुधाकर ढोबळे, रा. शिवाजीनगर आणि नीलेश महादेव मोहतुरे रा. भाग्यश्रीनगर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी खरबीच्या मातोश्री महिला नागरी सहकारी संस्थेत एजंट होते. या संस्थेचे प्रमुख हरिओम मोहतुरे आणि त्यांची पत्नी चंद्रकांता मोहतुरे आहे. महिला संस्था असल्यामुळे चंद्रकांता अध्यक्ष आहेत. सहकारनगर येथील रहिवासी शुभांगी अमित गोस्वामी यांच्यासह अनेक लोक संस्थेशी जुळलेले होते. त्यांनी आरोपींच्या माध्यमातून पतसंस्थेत गुंतवणूक केली होती. शुभांगीने फेब्रुवारी २०१९ पासून आतापर्यंत आरडीच्या माध्यमातून संस्थेत १.३३ लाख जमा केले. ते पैसे काढण्यासाठी त्या पतसंस्थेत पोहोचल्या असता आरोपींनी त्यांची रक्कम पतसंस्थेत जमाच केली नसल्याची माहिती मिळाली. शुभांगीनंतर इतर नागरिकांनाही आरोपींनी त्यांची रक्कम हडपल्याची माहिती मिळाली. त्यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासात शुभांगीसह १२ जणांच्या रकमेची अफरातफर केल्याचा खुलासा झाला. त्या आधारे पोलिसांनी सोनू ढोबळे, नीोश मोहतुरे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पीडित गुंतवणूकदारांनी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भूमिकाही तपासण्याची मागणी केली आहे. गुंतवणूकदारांच्या मते ते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. त्यांच्या सांगण्यानुसारच आरोपी एजंटला त्यांनी पैसे दिले होते. प्रकरण उजेडात आल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. बारकाईने तपास केल्यास आणखी पीडित समोर येऊ शकतात.