होलसेल किराणा दुकानात क्रिकेट बेटिंगचा अड्डा, पोलिसांना मिळाली टीप
By योगेश पांडे | Published: November 9, 2022 11:41 PM2022-11-09T23:41:47+5:302022-11-09T23:43:06+5:30
कृष्णानीचे इतवारीतील नेहरू पुतळ्याजवळ आर. पी. ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे.
नागपूर : होलसेल किराणा दुकानाच्या आड क्रिकेट बेटिंगचा अड्डा चालविणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश टोपणदास कृष्णानी (५३, देशपांडे ले-आउट, वर्धमान नगर) असे आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे शहरातील बुकींमध्ये खळबळ उडाली आहे.
कृष्णानीचे इतवारीतील नेहरू पुतळ्याजवळ आर. पी. ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. या व्यवसायाच्या आडून कृष्णानी हा क्रिकेट बेटिंगही करायचा. त्याने सतनामी नगर येथील रहिवासी राजेश शंकरलाल चेलानी याच्याकडून क्रिकेट बेटिंग आयडी घेतला होता. तो दोन वर्षांपासून दुकानातूनच ऑनलाइन क्रिकेट बेटिंग करत होता. झोन तीनचे उपायुक्त डीसीपी गजानन राजमाने यांच्या पथकाला ही ‘टीप’ मिळाली. बुधवारी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू होता. पोलिसांनी सापळा रचत कृष्णानीच्या दुकानावर छापा टाकला. पाच लाख रुपयांवर सट्टा लावताना कृष्णानी सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने राजेश चेलानी याच्याकडून आयडी घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी चेलानी याच्या भक्ती सागर अपार्टमेंट, सतनामी नगर येथील फ्लॅटवर छापा टाकला. कारवाईची माहिती असल्याने तो पोलिसांच्या हाती लागला नाही. शहरातील बड्या क्रिकेट बुकींमध्ये राजेशचा सहभाग आहे. यापूर्वीही तो बेटिंग करताना पकडला गेला आहे.पूर्व नागपुरात त्याचे मोठे ‘नेटवर्क’ आहे. त्याच्याकडून आयडी घेऊन येथील अनेक तरुण क्रिकेट बेटिंग करत आहेत. आरोपीकडून रोख रकमेसह ३२ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली मटका अड्डा
दरम्यान, ऑनलाइन लॉटरी सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या जुनी कामठीतील मटका अड्ड्यावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या एसएसबीने दोन आरोपींना अटक केली आहे. प्रशांत सुरेश बावनकुळे (४२), प्रवीण महादेवराव तुपट (३७) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार प्रशांत सुरेश बावनकर (५०) आणि प्रदीप गंगाधर साखरकर (३६) हे फरार आहेत. जुनी कामठी येथील दुर्गा चौकात आरोपींचे चक्रधर ऑनलाइन लॉटरी सेंटर आहे. तेथे ते मटका अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून २ लाख ५१ हजारांचे संगणक व रोख ३,२६० रुपये जप्त करण्यात आले. तसेच जुनी कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.