क्रिकेट विश्वचषक सामन्यांच्या पार्श्वभूमीवर सट्टेबाज सक्रीय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 09:34 PM2019-07-08T21:34:45+5:302019-07-08T21:36:38+5:30
गुजरातमधील ऑनलाईन रॅकेटचा पडदाफाश
मुंबई - सध्या जगात विश्वचषक क्रिकेट ची धूम असली तरी या विश्व चषकाच्या सामन्यांवरून सट्टेबाजार देखील तेजीत आला आहे.पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सट्टा लावण्याच्या आधुनिक पद्धतीदेखील या सट्टेबाजांनी शोधून काढल्या आहेत. अश्याच पाच सट्टेबाजाना मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून हा आधुनिक ऑनलाईन सट्टेबाजार उघड केला आहे. मुकेश ठक्कर, योगेश ठक्कर, हार्दिक ठक्कर, कार्तिकी ठक्कर, धवल ठक्कर सर्व रहाणार गांधी धाम अहमदाबाद ,गुजरात अशी या सट्टेबाजांची नावे आहेत. www.dimondexch.com या वेबसाईट आणि मोबाईल अँपद्वारे ही आधुनिक सट्टेबाजी सुरु होती. याबाबत प्रथम मुंबईमधून पोलिसांनी दोन जणांना आणि राजस्थानच्या उदयपूरमधून तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लॅपटॉप, ११ मोबाईल, ६ वायफाय डोंगल, एलईडी टीव्ही, सेट टॉप बॉक्स, २ डेबिट कार्ड, एक मोटार कार आणि १५ हजार ३५० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. वेबसाईट आणि अँपद्वारे एक युआरएल लिंक बनवून त्याद्वारे नव्या सट्टे लावणाऱ्या या वेबसाईट आणि अँपवर लॉग इन करून सट्टा लावता येत होता. एजंट त्याचे रोख रक्कम घेत आणि त्याचे पॉईंट तयार करून प्रत्येक सामन्यांवर, ओव्हर आणि विकेट अशा विविध गोष्टींवर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.