खोटे दागिने गहाण ठेवून बँकेला 11 लाखास गंडवणाऱ्या भामट्यासह 2 सराफांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 09:56 PM2021-09-16T21:56:54+5:302021-09-16T21:59:12+5:30
Fraud Case : सदर दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र बँकेने नियुक्त केलेले सराफ नवघर मार्गावरील सुरभी ज्वेलर्स चे ललित जैन यांनी दिले होते. त्या आधारेच तिवारीला कर्ज देण्यात आले होते.
मीरारोड - खोटे दागिने गहाण ठेऊन बँकेला ११ लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्यासह ते दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या बँकेच्याच दोघा सराफांविरुद्ध नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदर पूर्वेच्या न्यु गोल्डन नेस्ट भागातील कॅनरा बँक शाखेतुन रामकुमार राजाराम तिवारी (५९ ) रा. ओस्तवाल शॉपिंग सेंटर, जेसलपार्क याने जुलै ते ऑगस्ट दरम्यान थोडे थोडे करून ४ वेळा बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून ११ लाख २ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सदर दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र बँकेने नियुक्त केलेले सराफ नवघर मार्गावरील सुरभी ज्वेलर्सचे ललित जैन यांनी दिले होते. त्या आधारेच तिवारीला कर्ज देण्यात आले होते.
बँकेच्या नियमानुसार २ लाखां पेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर बँकेच्या मुख्य शाखे मार्फत तारण सोन्याची तपासणी केली जात असल्याने राज आर्ट ज्वेलर्सचे मालक अरुण सोनी यांनी देखील दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले होते.
दरम्यान कॅनरा बँकेच्या गोडदेव शाखेत ७ सप्टेंबर रोजी तिवारी हा दागिने घेऊन कर्जासाठी गेला असता व्यवस्थापक सौरभ गुप्ता यांना संशय आला. संगणकावर तपासणी केली असता तिवारी याने त्याच बँकेच्या न्यू गोल्डन नेस्ट शाखेतुन ४ वेळा सोने तारण कर्ज घेतल्याचे आढळले. त्या बाबत विचारणा करताच तिवारी दागिने घेऊन निघून गेला.
संशय बाळावल्याने गुप्ता यांनी न्यू गोल्डन नेस्ट शाखेचे व्यवस्थापक प्रभाकर साह यांना कळवले. त्या नंतर तिवारीने गहाण ठेवलेल्या दागिन्यांची मान्यताप्राप्त यंत्रणे कडून तपासणी केली असता सर्व दागिने बनावट आढळले. तसेच तिवारी देखील राहत्या पत्त्या वरून गेले दोन महिन्यांपासून बेपत्ता होता. अखेर १४ सप्टेंबर रोजी राजाराम तिवारी सह बँकेचे नियुक्त सराफ ललित जैन व अरुण सोनी अश्या तिघांविरुद्ध कटकारस्थान करून खोटे प्रमाणपत्र देत बँकेची फसवणूक केली म्हणून नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.