चोरीचा माल खरेदीप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 09:49 PM2021-02-02T21:49:58+5:302021-02-02T21:50:08+5:30
२० डिसेंबर २०२० ते २९ जानेवारी २०२१ या कालावधीत सावरदरी येथील एका खासगी कंपनीतून चोरट्यांनी दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले.
पिंपरी : कंपनीत चोरी करून त्याची भंगार व्यावसायिकांना विक्री केली. याप्रकरणी तीन आरोपींना १२ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावरदरी (ता. खेड) येथे शुक्रवारी (दि. २९) सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता.
इम्रान शाैकतअली बागवान (वय १९), इम्रान मुस्तफा हुसेन (वय २०), रणजित राजेंद्र चौहान (वय २३, तिघेही रा. उत्तरप्रदेश), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, भाजप नगरसेविकेचा पती अनिल उर्फ बापू घोलप (रा. यमुनानगर, निगडी) आणि रशीद (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे दोघे फरार आहेत. याप्रकरणी अमोल प्रकाश डोबळे (वय ३६, रा. सावरदरी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ३०) फिर्याद दिली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर २०२० ते २९ जानेवारी २०२१ या कालावधीत सावरदरी येथील एका खासगी कंपनीतून चोरट्यांनी दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी सुरक्षारक्षक रणजित चौहान याला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत कंपनीतून साहित्य चोरी केल्याचे कबूल केले. तसेच आरोपी बागवान आणि हुसेन यांना चोरीचा माल विकल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी बागवान व हुसेन यांनाही अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी फरार आरोपी घोलप आणि रशीद यांना माल विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपी घोलप व रशीद या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.