खंडित वीजपुरवठा परस्पर जोडल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:33 AM2021-03-04T00:33:02+5:302021-03-04T00:33:11+5:30

वारंवार विनंती करूनही महावितरणच्या कल्याण परिमंडळात वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सध्या सुरू आहे.

Crime against both in connection with disconnected power supply | खंडित वीजपुरवठा परस्पर जोडल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

खंडित वीजपुरवठा परस्पर जोडल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
डोंबिवली : थकबाकीपोटी खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडून वीजवापर करणे महागात पडू शकते. परस्पर वीज जोडल्याबद्दल महावितरणने नुकताच मुरबाड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. थकीत वीज बिलामुळे खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडू नये किंवा इतर ग्राहकांकडून तो घेऊन विजेचा वापर करू नये, असे प्रकार आढळल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
वारंवार विनंती करूनही महावितरणच्या कल्याण परिमंडळात वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सध्या सुरू आहे. यात शहापूर उपविभागातील खर्डी व कसारा येथील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला होता. शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कट्टकवार, सहायक अभियंता हेमंत गायकवाड व त्यांच्या पथकाने केलेल्या पडताळणीत खर्डी व कसारा येथील दोन ग्राहकांनी पैसे न भरता वीजपुरवठा परस्पर सुरू केल्याचे आढळले. अरुण तुळशीराम भोईर व एस.के. एज्युकेशन ट्रस्ट, अशी या वीज ग्राहकांची नावे असून, त्यांच्याविरुद्ध खंडित वीजपुरवठा परस्पर जोडल्याप्रकरणी वीज कायदा-२००३ नुसार गुन्हा दाखल केल्याचे महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. अशी कारवाई टाळण्यासाठी विहित मुदतीत वीज बिलाचा भरणा करून अखंडित वीजसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Crime against both in connection with disconnected power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.