गाडी खरेदीतून सव्वा कोटींना गंडा, डिलरविरोधात गुन्हा, पैसे घेऊनही कार देण्यास टाळाटाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 09:13 AM2022-06-10T09:13:24+5:302022-06-10T09:13:46+5:30
Crime News : उरण परिसरात राहणाऱ्या तीन व्यावसायिकांनी ओळखीतून नेरुळमधील गोल्डन मोटर्समध्ये मर्सिडिज कारसाठी चौकशी केली होती. यावेळी त्यांना इतर डिलरपेक्षा स्वस्तात कार मिळवून दिली जाईल, असे सांगण्यात आले होते.
नवी मुंबई : कार खरेदीसाठी पैसे देऊनही डिलरने कार न दिल्याने डिलर विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तिघांची एकूण १ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. अशा प्रकारे इतर कोणाची फसवणूक झाली आहे का याचा अधिक तपास नेरुळ पोलीस करत आहेत.
उरण परिसरात राहणाऱ्या तीन व्यावसायिकांनी ओळखीतून नेरुळमधील गोल्डन मोटर्समध्ये मर्सिडिज कारसाठी चौकशी केली होती. यावेळी त्यांना इतर डिलरपेक्षा स्वस्तात कार मिळवून दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार संबंधितांना पाहिजे असलेली मर्सिडीज कार ७८ लाखऐवजी डिस्काउंटमध्ये ४५ लाखाला मिळणार होती. यामुळे तिघांनी एकूण १ कोटी १५ लाख रुपये गोल्डन कारचे संदीप कांदोळकर ऊर्फ संतोष वेंगुर्लेकर व विक्रम तेलोरे यांच्याकडे दिले होते.
परंतु फेब्रुवारीमध्ये हा व्यवहार होऊन देखील अद्यापपर्यंत त्यांना कार देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी दिलेले पैसे परत मागितले असता ते देण्यास देखील टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे झालेल्या फसवणूक प्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता बुधवारी नेरुळ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अशाप्रकारे इतर कोणाची फसवणूक झाली आहे का याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहेत. नागरिकांनी सावधपणे व्यवहार करावा असे आवाहन केले आहे.
कोट्यवधींचा अपहार या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने कांदळकर व तिलोरे यांना अटक केली आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यांनी महागड्या गाड्यांच्या व्यवहारातून अनेकांना गंडा घालून कोट्यवधी रुपयांचा अपहार केलेला असल्याने आता आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत आहे.