अल्पवयीन मुलीचे हात पिवळे करणाऱ्या आईसह पाच जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 20:35 IST2021-06-29T20:34:43+5:302021-06-29T20:35:11+5:30
Crime News : चार जणांना अटक : मुलीची आई फरार, मध्य प्रदेशात उरकला विवाह

अल्पवयीन मुलीचे हात पिवळे करणाऱ्या आईसह पाच जणांवर गुन्हा
भद्रावती(चंद्रपूर) : आपल्या १५ वर्षीय मुलीचे हात पिवळे करणाऱ्या आईसह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भद्रावतीतील ही खळबळजनक घटना मुलीच्या मोठ्या बहिणीच्या तक्रारीवरून उघड झाली आहे. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून मुलीची आई फरार आहे.
सविता अवसारे (४९), बसंती तांडे (४४) राहणार भंगाराम वार्ड, विक्रम अंजीरवार (२५), अरविंद मालवीय (२७) दोघेही रा. राजापूर मध्य प्रदेश अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. आईने पुढाकार घेऊन मध्य प्रदेशातील राजापूर येथे आपल्याच अल्पवयीन मुलीचा विवाह २१ एप्रिलला विवाह लावून दिला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे वास्तव्यास असलेल्या मुलीच्या मोठ्या बहिणीला याचा कुणकुण लागली. तिने भद्रावती येथील आपले घर गाठून याबाबतची अधिक माहिती जाणून घेतली असता आपल्या अल्पवयीन बहिणीला विवाह करण्यात आल्याचे लक्षात आले. अल्पवयीन मुलीचा विवाह करणे गुन्हा असल्याने तिने थेट भद्रावती पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार सुनीलसिंग पवार यांनी विशेष पथक तयार केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी भद्रावतीतून आरोपींना अटक केली. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.