साडेनऊ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवकांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:17 IST2020-06-10T16:15:11+5:302020-06-10T16:17:58+5:30
१४ व्या वित्त आयोगाच्या खात्यातील ९ लाख ५० हजार रूपये रक्कमेचा धनादेश गहाळ झाल्याचा बनाव

साडेनऊ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवकांविरुध्द गुन्हा
जालना : १४ व्या वित्त आयोगाच्या साडेनऊ लाख रूपयांच्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी परतूर तालुक्यातील बाबूलतारा येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्याविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बाबूलतारा येथील सरपंच सरस्वती शिवाजी घाटुळे व ग्रामसेवक रमेश शिवराम बोर्डे यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या खात्यातील ९ लाख ५० हजार रूपये रक्कमेचा धनादेश गहाळ झाल्याचा बनाव करून सदर रक्कम गावातील खाजगी इसम विष्णू ज्ञानदेव मुळे यांच्या खात्यावर वर्ग करून शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले.
यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी गटविकास अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी परतूर पंचायत समितीचे आरोग्य पर्यवेक्षक प्रवीण नारायण नाखले यांच्या फिर्यादीवरून सरपंच सरस्वती शिवाजी घाटुळे व ग्रामसेवक रमेश शिवराम बोर्डे यांच्याविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.