भावजयीस मारहाणप्रकरणी शिवसेना आमदाराविरुद्ध गुन्हा; १० जण आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 07:47 AM2022-02-19T07:47:54+5:302022-02-19T07:48:20+5:30
वैजापूर तालुक्यातील सटाणा येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते गुरुवारी भाजपा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावाची पत्नी जयश्री दिलीप बोरनारे या पतीसोबत हजर होत्या.
औरंगाबाद : भाजपाच्या कार्यक्रमात जाऊन मंत्र्यांचा सत्कार केल्याच्या कारणावरून शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या भावजयीला जबर मारहाण केल्याची घटना वैजापूर येथे शुक्रवारी गोदावरी काॅलनी परिसरात घडली. या प्रकरणी आमदार बोरनारे यांच्यासह दहा जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजापूर तालुक्यातील सटाणा येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते गुरुवारी भाजपा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावाची पत्नी जयश्री दिलीप बोरनारे या पतीसोबत हजर होत्या. त्यांनी डॉ. कराड व माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांचा सत्कार केला. हा सत्कार बोरनारे कुटुंबीयांच्या जिव्हारी लागला. त्याचा राग मनात धरून आमदार बोरनारे यांच्या कुटुंबीयांनी भावजयीस लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. आमदार बोरनारे स्वतः या मारहाणीत सहभागी झाले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या भावजयी या गोदावरी काॅलनीत एका नातेवाईकांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमात पती सोबत सहभागी झालेल्या होत्या. या भर कार्यक्रमातच त्यांना बोरनारे कुटुंबातील १० जणांनी जबर मारहाण केली. त्यात त्या जखमी झाल्या आहेत. तसेच त्यांच्या पतीला देखील मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर फिर्यादी महिलेने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. उपचार केल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी आमदार रमेश बोरनारे, त्यांचा भाऊ संजय नानासाहेब बोरनारे, दीपक बाबासाहेब बोरनारे, अजिंक्य संपत बोरनारे, रणजीत मधुकर चव्हाण, संपत नानासाहेब बोरनारे, अबोली संजय बोरनारे, वर्षा संजय बोरनारे, संगिता रमेश बोरनारे (सर्व रा. मुरारी पार्क, वैजापूर) व दिनेश शाहु बोरनारे (रा.सटाणा) या दहा जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.