लाचप्रकरणी वाशिमच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 03:50 PM2018-07-17T15:50:37+5:302018-07-17T15:54:02+5:30
वाशिम - तक्रारदाराच्या नातेवाईकाविरूद्ध दाखल गुन्हयात जमानत देण्याच्या नावाखाली लाचेची मागणी करणाऱ्या वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फ १७ जुलै रोजी गुन्हा दाखल.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - तक्रारदाराच्या नातेवाईकाविरूद्ध दाखल गुन्हयात जमानत देण्याच्या नावाखाली लाचेची मागणी करणाऱ्या वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फ १७ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नितीन मनोहर काळे व विष्णू भगवान बोंडे अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
तक्रारदाराच्या नातेवाईकांविरूद्ध वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात जमानत देण्याकरिता पोलीस कर्मचारी नितीन काळे व विष्णू बोंडे यांनी आठ हजार रुपये लाचेची मागणी केली होती, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ जून रोजी दाखल झाली होती. पैशाच्या तडजोडीकरिता शिवाजी चौक, पोलीस चौकी वाशिम येथे तक्रारदाराला बोलाविण्यात आले होते. २८ व २९ जून रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, आरोपींनी तक्रारदाराकडून पंचासमक्ष तडतोडअंती दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने २९ जून रोजी शिवाजी चौकातील पोलीस चौकी येथे सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपींना तक्रारदाराच्या हालचालीबाबत संशय आल्याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारली नाही. याप्रकरणी १७ जुलै रोजी आरोपींविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे, पोलीस कर्मचारी नंदकिशोर परळकर, दिलीप बेलोकर, विनोद सुर्वे, अरविंद राठोड यांनी पार पाडली.