एसपींचा फोटो डीपीवर ठेऊन पैसे मागणाऱ्या दोन भामट्यांवर गुन्हा
By संजय तिपाले | Published: August 21, 2022 11:02 AM2022-08-21T11:02:38+5:302022-08-21T11:02:48+5:30
वेगवेगळी शक्कल लढवून सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या तक्रारी वाढत असताना १९ ऑगस्ट रोजी खुद्द पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनाही याचा अनुभव आला.
बीड: पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा फोटो व्हाट्सअप डीपीवर ठेऊन ते असल्याचे भासवत चॅटिंग करून पैशांची मागणी करणाऱ्या दोन भामट्यांवर अखेर २० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवेगळी शक्कल लढवून सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या तक्रारी वाढत असताना १९ ऑगस्ट रोजी खुद्द पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनाही याचा अनुभव आला. त्यांचा फोटो स्वतःच्या व्हॉटस्अप डीपीला ठेऊन भामट्यांनी नंदकुमार ठाकूर असल्याचे भासवून संपर्क यादीतील लोकांशी चॅटिंग केली. नंतर पैशांची मागणी करत अमेझॉन पे गिफ्ट कार्ड्स प्रत्येकी १० हजार २० पीस खरेदी करा असा संदेश धाडला.
हॅकरने थेट पोलीस अधीक्षकांनाच आव्हान दिल्याने खळबळ उडाली होती. मित्रयादीतील अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना संपर्क साधून याबाबतची माहिती कळविल्यावर ठाकूर यांनी फेसबुकवर पोस्ट करुन माझ्या फोटोचा वापर करुन कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्यास प्रतिसाद देऊ नये, दुर्लक्ष करावे, अशी सूचना केली होती. शिवाय गंभीर दखल घेत गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेतला होता.
जिल्हा वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक कैलास भारती यांनी नंदकुमार ठाकूर यांचा फोटो डीपीवर ठेऊन चॅटिंग करणाऱ्या ७८९८५०९०५० व ६२३९२८४७९६ या मोबाईल क्रमांक धारकांवर बीड ग्रामीण ठाण्यात २० रोजी रात्री साडेनऊ वाजता फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता बाह्यवळण रस्त्यावर गस्त घालत असताना उपरोक्त दोन क्रमांकावरून संदेश पाठवून फसवणुकीचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक संतोष साबळे तपास करत आहेत. दरम्यान, सायबर विभागाकडे गुन्हा वर्ग केला जाणार असून प्राथमिक तपासात हे क्रमांक राजस्थानमधील धवलपूरचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
माझा फोटो व्हॉटस्अप डीपीला ठेऊन संदेश पाठविले होते. मात्र, कोणाचीही फसवणूक झाली नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर विभाग तपास करत आहे. खात्री केल्याशिवाय कोणीही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये. - नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड