मथुरेतील मंदिरात नमाज पढणाऱ्या दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 05:58 AM2020-11-03T05:58:56+5:302020-11-03T05:59:20+5:30
Crime News : दिल्लीस्थित ‘खुदाई खिदमतगार’ या संघटनेचे सदस्य असलेले चौघेजण २९ ऑक्टोबर रोजी मंदिरात आले होते. त्यातील फैजल खान आणि चांद मोहम्मद या दोघांनी मंदिर प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता मंदिरात नमाज पढला.
मथुरा : येथील नंदगाव परिसरातील नंदबाबा मंदिरात नमाज पढणाऱ्या दोघांविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. २९ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला. मंदिरात दोघे जण नमाज पढत असलेले छायाचित्र समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर नंदगावातील तिघांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
दिल्लीस्थित ‘खुदाई खिदमतगार’ या संघटनेचे सदस्य असलेले चौघेजण २९ ऑक्टोबर रोजी मंदिरात आले होते. त्यातील फैजल खान आणि चांद मोहम्मद या दोघांनी मंदिर प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेता मंदिरात नमाज पढला. खान आणि मोहम्मद हे दोघे नमाज पढत असताना त्यांचे साथीदार आलोक रतन आणि नीलेश गुप्ता या दोघांनी त्यांची छायाचित्रे काढली व ती समाजमाध्यमांवर अपलोड केली.
समाजमाध्यमांवर ही छायाचित्रे व्हायरल होऊ लागताच मंदिर परिसरातील मुकेश गोस्वामी, शिवहरी गोस्वामी व कान्हा यांनी या प्रकारणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी खान, मोहम्मद यांच्याबरोबरच आलोक आणि नीलेश यांच्याविरोधात भादंविनुसार कलम १५३-अ, २९५ आणि ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (वृत्तसंस्था)