प्रतिबंधित औषधे विकणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश, दोघांना क्राइम ब्रांचकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 03:57 AM2020-01-21T03:57:01+5:302020-01-21T03:57:29+5:30
कॉल सेंटरचा वापर करत विदेशात प्रतिबंधीत औषधांची विक्री करण्यात येत होती.
मुंबई : कॉल सेंटरचा वापर करत विदेशात प्रतिबंधीत औषधांची विक्री करण्यात येत होती. याप्रकरणी टोळीचा पदार्फाश करत दोघांच्या मुसक्या क्राईम ब्रांचच्या कक्ष १० ने सोमवारी आवळल्या. मुदस्सर मकानदार (३४) आणि अशले डिसूझा (३८) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असुन ते अनुक्रमे चांदीवली आणि अंधेरीचे राहणारे आहेत.
अंधेरीच्या मरोळ परिसरात ए एम एम नामक बोगस कॉलसेंटर चालविले जात आहे. तसेच यामार्फत अमेरिकेतील नागरिकांना प्रतिबंधित औषधांची विक्री केली जात आहे, अशी माहिती कक्ष १० चे प्रमुख सुनील माने यांना मिळाली. त्यानुसार १७ जानेवारी रोजी त्यांच्या पथकाने या कॉलसेंटरवर धाड टाकली.
त्यावेळी जवळपास वीस जण कानाला मायक्रोफोन लावुन एक स्क्रिप्ट वाचुन दाखवून लोकांना व्हायग्रा, लिवेट्रो, ट्रामाडोल, प्रोपेसीया, सोमा, अमॉक्सिलिन सारखी औषधे विकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी असलेले संगणक, राउटर, सर्व्हर कनेकटर तसेच अन्य सामग्री ताब्यात घेत दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.