शाळेकडे खंडणी मागणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 12:48 PM2019-04-25T12:48:28+5:302019-04-25T12:50:03+5:30
वसई न्यायालयात 156 (3) प्रमाणे तक्रार दाखल केली होती
नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग विभागातील एका शाळेकडे खंडणी मागणाऱ्या चौघांविरोधात शुक्रवारी वसई न्यायालयाच्या आदेशाने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.
नालासोपारा पूर्वेकडील ओस्तवाल नगरीमधील सरस्वती हाईट्स बिल्डिंगमधील रूम नंबर 707/708 मध्ये राहणाऱ्या मंजू श्रीदेव यादव (30) यांच्या मालकीची धानिवबाग येथे माता भगवती युग निर्माण विद्यालय ही शाळा आहे. शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील पूजा, अजित मनिकांत, मनीषा भावेश प्रजापती आणि भावेश प्रजापती हे चौघे 29 नोव्हेंबर 2018 ला सकाळी साडे अकराच्या दरम्यान शाळेत प्रवेश करून मुख्य गेट बंद करून घेतला. मंजू यांनी गेट उघडण्यासाठी चोघांना विनंती केली की, शाळा सुटणार आहे पण त्यांनी गेट उघडण्यास नकार देत शाळा सुरू ठेवायची असेल तर 5 लाख रुपयांची मागणी केली. गेट उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी भावेश प्रजापती यांनी अश्लील चाळे केले असल्याची तक्रार दिली आहे. मंजू यांनी सदर घटना वालीव पोलिसांना सांगितल्यावर तक्रार दाखल केली. तरीही हे चौघे त्रास देत असल्यामुळे शेवटी कंटाळून वसई न्यायालयात 156 (3) प्रमाणे तक्रार दाखल केली होती त्यावर न्यायालयाने चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी वालीव पोलिसांना आदेश दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून हे चौघे शाळेला, शिक्षकांना पालकांसमोर दमदाटी व शिविगाळ करत होते. त्यांच्याविरुद्ध वालीव पोलीस स्टेशनला तक्रार दिली पण हे शांत न राहता जास्त त्रास देण्यास सुरुवात केल्यावर शेवटी कंटाळून वसई न्यायालयात केस दाखल केली होती. - मंजू यादव (तक्रारदार आणि शाळेचे मालक)